विवाह सोहळ्यात टाळा चुकीच्या प्रथा  

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या मेळाव्यात आवाहन 

पुणे : मराठा समाजाने विवाह सोहळ्यात चुकीच्या प्रथा टाळून सकारात्मक बदल करावेत, असे आवाहन 
करणारा ठराव अखिल भारतीय मराठा महासंघाच्या रविवारी झालेल्या मेळाव्यात करण्यात आले. 

मेळाव्याचे उद्‌घाटन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. शशिकांत पवार यांच्या हस्ते झाले, या वेळी हा ठराव मंजूर करण्यात आला. महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे, विनायक पवार, प्रकाश देशमुख, शांताराम कुंजीर, प्रवीण गायकवाड आदी उपस्थित होते. मेळाव्यात "ज्ञानाची आस, गुणवत्तेचा विकास, व्यावसायिकतेचा ध्यास' आणि "मराठ्यांचे विवाह सोहळे चालले कुणीकडे', या विषयांवर परिसंवाद झाले. ऍड. पवार यांनी आपण अध्यक्षपद सोडणार असून, लवकरच महासंघाची नवीन कार्यकारिणी जाहीर केली जाईल, असे सांगितले. 

मराठा समाजातील विवाह सोहळ्यांमध्ये साखरपुडा, टिळा इत्यादींसह विविध प्रथांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे. ही बाब सामाजिक प्रतिष्ठेचा विषय होऊ पाहात आहे. यामुळे समाजाचे आर्थिक व सामाजिक नुकसान होत आहे. मुलींच्या भवितव्यासाठी व सामाजिक प्रतिष्ठेसाठी वधूपिता आपले आयुष्य पणाला लावत आहेत. यामुळे मुलींचे लग्न हा आता चिंतेचा विषय झाला आहे. वधू व वरपक्षाने पैशांची बचत करून मुलामुलींचे विवाहानंतरचे भविष्य सुखकर करता येईल यासाठी प्राधान्य द्यावे, विवाह सोहळ्यांतील राजकीयीकरण, लग्न उशिरा लागण्याचे वाढते प्रस्थ, यासह विविध चुकीच्या प्रथा रोखण्याचे आवाहन समाजातील युवक- युवतींना या वेळी करण्यात आले. तसेच, याबाबतचा ठरावही मंजूर करण्यात आला. 

सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी प्रास्ताविक केले. "मराठ्यांचे विवाह सोहळे चालले कुणीकडे' या विषयावरील परिसंवादात कलावंत प्रवीण तरडे, सामाजिक कार्यकर्ते सायली धनाबाई, ब्रह्मा चट्टे, प्रवचनकार चंद्रकांत महाराज वांजळे, विराज तावरे आदी सहभागी झाले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Avoid wrong practices in wedding ceremonies