पत्नीला पोटगी देण्यास टाळाटाळ 

सुनीता महामुणकर
रविवार, 14 जुलै 2019

घटस्फोटाच्या प्रकरणात पत्नीला पोटगी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या आणि सुनावणीला गैरहजर राहून मोबाईल बंद करून ठेवणाऱ्या पतीविरोधात विरोधात मुंबई उच्च न्यायालयाने वॉरंट बजावण्याचे आदेश दिले आहेत. 

मुंबई- घटस्फोटाच्या प्रकरणात पत्नीला पोटगी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या आणि सुनावणीला गैरहजर राहून मोबाईल बंद करून ठेवणाऱ्या पतीविरोधात विरोधात मुंबई उच्च न्यायालयाने वॉरंट बजावण्याचे आदेश दिले आहेत. 

संगणक अभियंता असलेल्या आणि एका खासगी कंपनीत उच्चपदावर काम करीत असलेल्या पतीच्या विरोधात पत्नीने न्यायालयात याचिका केली आहे. पत्नीला आणि त्यांच्या अल्पवयीन मुलीला दर महिन्याला पोटगी दाखल सात हजार रुपये देण्याचे आदेश कुटुंब न्यायालयाने गेल्या वर्षी दिले आहेत. मात्र या आदेशाला पतीने गंभीरपणे घेतलेले नाही. पत्नीला पोटगी देण्याबाबत चालढकल करीत असल्यामुळे पत्नीने उच्च न्यायालयात याचिका केली आहे. 

याचिकेवर न्या. अकिल कुरेशी आणि न्या. शाहरुख काथावाला यांच्या खंडपीठापुढे गेल्या आठवड्यात सुनावणी झाली. या सुनावणीला हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने पतीला दिले होते; मात्र त्या वेळेस तो सुनावणीला हजर झाला नाही आणि कोणतीही सूचनादेखील त्याच्या वकिलांना देण्यात आलेली नाही, असे त्याच्या वकिलांनी सांगितले. त्यामुळे न्यायालयाने त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्याचे आदेश दिले होते. 

मात्र पुढील सुनावणीला हजर राहीन, असे पतीने दुपारच्या सत्रात खंडपीठाला सांगितले. त्यामुळे न्यायालयाने वॉरंट रद्द केले; मात्र शुक्रवारी न्यायालयात झालेल्या सुनावणीलाही पती गैरहजरच राहिला. शिवाय त्याने त्याचा मोबाईलही स्वीच ऑफ केला होता आणि वकिलांना कोणती सूचनाही दिलेली नव्हती. 

न्यायालयाच्या आदेशाचा भंग 
या प्रकाराची माहिती वकिलांनी खंडपीठाला दिली. त्यामुळे खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली. नवऱ्याने जाणीवपूर्वक फोन बंद केला असून तो वकिलाचे फोनही घेत नाही. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा भंग त्याने केला आहे, असे म्हणत खंडपीठाने त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्याचे आदेश दिले आहेत. पुढील आठवड्यात यावर सुनावणी होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Avoidance of alimony to the wife divorce case