
नाशिक : येथी ल ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ विज्ञान साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर अध्यक्ष असल्याने ग्रंथदिंडीच्या माध्यमातून मराठी विज्ञान साहित्याचा जागर करण्यात आला. शुक्रवारी (ता. ३) सकाळी नऊला टिळकवाडी येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथून पालकमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील, कृषिमंत्री तथा उपाध्यक्ष दादा भुसे यांच्या हस्ते ग्रंथांचे पूजन करून दिंडीस प्रारंभ करण्यात आला.
शहरातीन नऊ विभागांतील शाळांमधील विद्यार्थी ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते. कुसुमाग्रज प्रतिष्ठानपासून वारकरी मंडळी व ढोल-ताशांच्या गजरात सुरू झालेल्या दिंडीला सुरवात झाल्यानंतर रामायण निवासस्थानी महापौर सतीश कुलकर्णी यांनी पूजन करत ग्रंथदिंडी पुढे नेली. लेझीम, बँड, टाळ-मृदंगाच्या गजरात विद्यार्थ्यांनी शहरात संमेलनाची वातावरणनिर्मिती केली. विद्यार्थ्यांनी विविध संदेश असलेल्या फलकांद्वारे वाचनसंस्कृती जिवंत राहावी यासाठी प्रबोधन केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची ग्रंथसंपदा असलेला चित्ररथ सर्वांचे आकर्षण ठरला. इस्पॅलियर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विज्ञानावर आधारित चित्ररथाद्वारे मराठी विज्ञान साहित्याचा जागर केला. नाशिक सायकलिस्ट असोसिएशने ‘सायकल चालवा’ असा संदेश दिला. ग्रंथदिंडीत विविध वेशभूषेतील शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. सार्वजनिक वाचनालयाजवळ आल्यानंतर ग्रंथदिंडीला विसावा देण्यात आला. येथे ग्रंथपूजन करून दिंडीने कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजनगरी मेट भुजबळ नॉलेज सिटीकडे प्रस्थान ठेवले. दिंडीचा समारोप कुसुमाग्रजनगरीत करण्यात आला.
साहित्य संमेलनाचा प्रारंभ करणाऱ्या या ग्रंथदिंडीच्या सोहळ्यासाठी मराठी भाषामंत्री सुभाष देसाई, विधानसभेचे उपाध्यक्ष तथा संमेलनाचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, महापौर सतीश कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार पंकज भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दीपक पांडे, उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी नितीन मुंडावरे, संमेलनाचे कार्याध्यक्ष हेमंत टकले, संमेलन समन्वयक समीर भुजबळ, निमंत्रक व प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर, संमेलनाच्या विविध समित्यांचे मुख्य समन्वयक विश्वास ठाकूर, डॉ. मो. स. गोसावी, प्राचार्य प्रशांत पाटील, ग्रंथदिंडी समितीचे प्रमुख विनायक रानडे, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे मकरंद हिंगणे आदींसह सारस्वत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हाती ‘वीणा’
संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी वीणा, तर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अभंग गात, टाळ-मृदंग वाजवत ग्रंथदिंडीत ठेका धरला.
ग्रंथदिंडीतील साहित्यसंपदा
नाशिकमधील मराठी साहित्य संमेलनातील ग्रंथदिंडीत लीळाचरित्र, श्री सकल संतगाथा, सार्थ श्री तुकारामांची गाथा, भारताचे संविधान, सोपी श्री ज्ञानेश्वरी, श्रीभगवद्गीता, महात्मा फुले समग्र वाङ्मय, विशाखा, ऋदिपूर चरित्रे आदी ग्रंथसंपदा पालखीत ठेवण्यात आली होती.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
ग्रंथदिंडी मार्गावर पोलिसांनी बॅरिकेड उभारले होते. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनीही ग्रंथदिंडीचा मार्ग नागरिकांना कळावा यासाठी दिंडी मार्गावर खुणा आखल्या होत्या. पोलिसांनी दिंडी मार्गावर चोख बंदोबस्त ठेवला होता. वाहतुकीस अडथळा ठरू नये यासाठी आधीच वाहतूक मार्गात बदल केला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.