वडील आझम शेख यांनी सांगितला महाराष्ट्र केसरी बालाचा जीवनप्रवास

वृत्तसंस्था
रविवार, 23 डिसेंबर 2018

62 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या किताबी लढतीत खेळणाऱ्या बालारफिक शेखचा हातखंडा हा माती गटाचा. मात्र, महाराष्ट्र केसरीचे लक्ष्य डोळ्यांपुढे ठेवून त्याने गेले वर्षभर आठवड्यातून दोन वेळा मॅटवर घाम गाळण्याचा शिरस्ता कायम ठेवला होता, असे बालारफिकचे वडील आझम शेख यांनी सांगितले. बालाने अभिजित कटकेचा पराभव करत महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकाविली.

जालना : येथे झालेल्या 62 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या किताबी लढतीत खेळणाऱ्या बालारफिक शेखचा हातखंडा हा माती गटाचा. मात्र, महाराष्ट्र केसरीचे लक्ष्य डोळ्यांपुढे ठेवून त्याने गेले वर्षभर आठवड्यातून दोन वेळा मॅटवर घाम गाळण्याचा शिरस्ता कायम ठेवला होता, असे बालारफिकचे वडील आझम शेख यांनी सांगितले. बालाने अभिजित कटकेचा पराभव करत महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकाविली.

बाला हा आपल्या बंधूंमधील तिसरा भाऊ. दोघांची कुस्ती इतकी धारदार नसल्याने कुटुंबाने बालारफिकवर लक्ष केंद्रित करत त्याला पुढे सरकवले. घरातील 5 पिढ्या कुस्तीत असलेल्या बालारफिकला शाळेची अशी विशेष गोडी नव्हतीच. तो आता बारावीचे शिक्षण घेत असला, तरी कुस्तीत त्याने स्वतःला उत्तम घडवले आहे, हे सांगताना आझम शेख यांचे डोळे पाणावले होते. गेल्या सात- आठ वर्षांपासून कुस्तीच्या आखाड्यात अविरत मेहनत करणाऱ्या या मल्लाला दीड वर्ष दुखापतीमुळे आखाड्यापासून लांब घालवावे लागले आहे. आपल्या मुलाचा स्वभाव अत्यंत शांत असून, तो कोणाची उणीदुणी काढण्याच्या भानगडीत पडत नसल्याचे आझम शेख यांनी अधोरेखित केले. 

बुलडाणा ते पुणे व्हाया कोल्हापूर 
मूळ बुलडाण्याचा असलेल्या बालारफिक शेखने आपल्या कुस्तीला धार देण्यासाठी मोठा कालावधी कोल्हापुरात घालवला आहे. जून 2018 पासून त्याने पुण्यातील गणेश दांगट यांच्या हनुमान आखाड्यात कुस्तीचे धडे गिरवले आहेत. त्याला गणपतराव आंदळकर, वांजळे वस्ताद यांनी घडवले असल्याचे आझम शेख यांनी सांगितले. 

मॅटवर आठवड्यातून दोनदा 
माती गटाचा यंदाच्या केसरी स्पर्धेत बादशाह ठरलेल्या बालारफिक शेखने महाराष्ट्र केसरी गटाची अंतिम फेरी मॅटवर असल्याने आपल्या सरावात बदल करून आठवड्यातून दोनदा मॅटवर सराव करण्याचा शिरस्ता राखला असल्याचे त्याचे वडील आझम शेख यांनी सांगितले. आता सध्या तो साडेचारला उठून पर्वती पालथी घालून सरावाला सुरवात करतो. मातीतील मल्ल असला, तरी जिममध्ये तो व्यायाम करण्यात वेळ घालवतो, असे आझम शेख शेवटी म्हणाले. 

Web Title: azam shaikh talked about bala rafik shaikh journey wins maharashtra kesri wrestling competition