काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी 'या' नेत्याची वर्णी; तर विरोधीपक्षनेतेपदी चव्हाण?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मे 2019

गटनेता, विरोधी पक्ष नेते पदासाठी उपनेते विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांचं नाव चर्चेत आहे. पण लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे वडेट्टीवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यामधील एकाची निवड होण्याची शक्यता आहे.

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असून त्यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गटनेता, विरोधी पक्ष नेते पदासाठी उपनेते विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांचं नाव चर्चेत आहे. पण लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे वडेट्टीवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यामधील एकाची निवड होण्याची शक्यता आहे.

नगर जिल्ह्यामध्ये विखे पाटील आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे एका पक्षात असले तरी त्यांचं जमत नाही. पण विखे पाटलांनी आता भाजपशी जवळीक साधल्यानंतर काँग्रेसकडून थोरातांना बळ दिलं जातंय. काही दिवसांपूर्वी संगमनेरमध्ये सभा घेतल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी थोरातांच्या निवासस्थानी मुक्कामही केला होता. शिवाय एकत्र प्रवास केला होता. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांच्यावर विधानसभेपूर्वी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देणार असल्याचं बोललं जातंय.

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी विरोधी पक्ष नेत्याची निवड केली जाईल. आमदारांच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांनीही भाजप आणि शिवसेनेला जाहीर मदत केली होती. त्यामुळे चार महिन्यांवर आलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पक्षबांधणीही काँग्रेससाठी महत्त्वाचा विषय आहे.  काँग्रेस गटनेते आणि विरोधी पक्ष नेते निवडीसाठी काँग्रेस आमदारांची बैठक होणार आहे. सोमवारी प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे बैठक घेणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Balasaheb Thorat and Prithviraj Chavan is in Race for Top Position Of maharashtra Congress