पंतप्रधान मोदी-चीनचे साटेलोटे.. मंत्री बाळासाहेब थोरातांचा घणाघात

Balasaheb Thorat criticizes Prime Minister Modi
Balasaheb Thorat criticizes Prime Minister Modi

संगमनेर ः गेल्या काही महिन्यांपासून चीन सीमेवर तणाव असताना अनेक चीनी कंपन्यांनी पंतप्रधान केअर्स फंडाला कोट्यवधी रूपयांचा निधी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीन यांचे नेमके काय साटेलोटे आहे? याचा खुलासा सरकारने करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

संगमनेर येथे पत्रकारांशी बोलताना थोरात म्हणाले की, ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शि जिनपिंग यांच्याबरोबर झोपाळ्यावर बसून चहा पित होते. त्यावेळी चीनने पाँईंट ३० आर पोस्ट चुमार, लडाख मध्ये अतिक्रमण करायला सुरुवात केली होती. त्यापूर्वीही २०१७ मध्ये चीनने डोकलाममध्ये घुसखोरी केलीच होती.

केंद्र सरकार भ्रामक विश्वात

चीन सीमेवर आपले २० जवान शहीद होऊनही मोदी सरकार मात्र अजूनही आपल्या भ्रामक विश्वातून बाहेर यायला तयार नाही. चीनने कधीही भारतीय हद्दीत घुसखोरी केली नाही किंवा कोणताही प्रदेश ताब्यात घेतला नाही असा दावा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाची दिशाभूल करून चीनला पोषक अशी भाषा बोलत आहेत. हे देशासाठी सर्वात घातक आहे. राहुलजी गांधी यांनी याबाबत वारंवार सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला. पण सरकारने त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले, असेही थोरात म्हणाले. 

राहुलजींच्या प्रश्नांना उत्तरे द्या

चीनने भारताच्या चार भागात घुसखोरी करुन जमीन बळकावण्यावर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले, तेव्हा मोदी सरकार व भाजपाने या विषयांना बगल देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. जबाबदार विरोधी पक्ष म्हणून देशाचे हित लक्षात घेऊन काँग्रेस पक्ष हे प्रश्न वारंवार उपस्थित करेल. हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुलजींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. आपल्या सरकारचे अपयश झाकण्यासाठी ते प्रश्नांपासून पळ काढत आहेत.

मोदी चीनला सर्वाधिक भेट देणारे पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चीनशी विशेष जवळीक आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी चारवेळा चीनला भेटी दिल्या. पंतप्रधान झाल्यानंतर सहा वर्षात पाचवेळा चीनला भेट देणारे भारताचे ते पहिलेच पंतप्रधान आहेत. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने सर्वात चिंताजनक व गंभीर बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनच्या कंपन्यांकडून पीएम केअर फंडासाठी घेतलेल्या देणग्या. या पीएम केअर फंडाची कार्यात्मक चौकट काय आहे? घटनेच्या कोणत्या कलमात हा फंड येतो याची कोणालाही माहिती नाही.

त्या फंडाचे अॉडिटही नाही

या फंडाची कार्यपद्धती काय आहे? यात जमा झालेल्या पैशाचे काय केले जाते? याबाबत कोणालाही माहिती नाही. कॅगसह कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाद्वारे या फंडाचे ऑडिटदेखील केले जाऊ शकत नाही. हा फंडाबद्दल RTI अंतर्गत माहितीही दिली जात नाही त्यामुळे पीएम केअर्स फंड हे एक मोठे गौडबंगाल आहे.
आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार २० मे २०२० पर्यंत या पीएम फंडात ९६७८ कोटी रुपये जमा झालेत. अनेक चीनी कंपन्यानी या पीएम केअर्स फंडाला मोठा निधी दिला आहे.

चीन-भाजप संबंध काय

चीन सीमेवर मोठ्या प्रमाणात तणाव असताना चीनी कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात दिलेला निधीमुळे चीन आणि भाजपाचे संबंध काय आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाने देशातील जनतेला दिली पाहिजेत असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.


  • काँग्रेस पक्षाचे केंद्र सरकारला प्रश्न१) २०१३ मध्ये चीनने सीमेवर कुरापती केल्या असतानाही पंतप्रधान मोदी यांनी चीनच्या कंपन्यांकडून निधी का घेतला?
  • २) चिनची वादग्रस्त कंपनी HUAWEI कडून पंतप्रधानांनी ७ कोटी रुपये घेतले का? या कंपनीचे चीनचे लष्कर पीपल्स लिबरेशन आर्मीशी संबंध आहेत का?
  • ३) चीनच्या TIKTOK कंपनीने पीएम केअर फंडात ३० कोटींची देणगी दिला आहे का?
  • ४) पेटीएम ने याच पीएम केअर फंडात १०० कोटी दिले आहेत का?.
  • ५) XIAOMI, या कंपनीने याच फंडात १५ कोटी दिले आहेत का?
  • ६) OPPO, कंपनीने पीएम केअरमध्ये १ कोटी दिलेत का?
  • ७) मोदींनी पंतप्रधान नॅशनल रिलीफ फंडातील देणग्या पीएम केअर फंडात वळवल्या आहेत का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com