
Balasaheb Thorat : काँग्रेसमधील नाराजीनाट्यानंतर बाळासाहेब थोरातांचे गटनेतेपद अडचणीत?
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधील अंतर्गत खदखद दिसून येऊ लागली आहे. अशातच नाशिक पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे काही घडलं त्यानंतर काँग्रेसमध्ये नेत्याची नाराजी बाहेर दिसू लागली आहे. त्याचबरोबर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबद्दल पक्षात व्यक्त केलेली नाराजी, नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत घेतलेले निर्णय; तसेच पक्ष आणि तांबे कुटुंबात निर्माण झालेले वाद यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे काँग्रेसमधील विधिमंडळ पक्षनेते पद अडचणीत येण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
तर नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडून आल्यानंतर अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीवेळी पक्षाने दिलेल्या चुकीच्या एबी फॉर्मवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली होती. याशिवाय बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र पाठवून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत काम करणे अशक्य असल्याचेही स्पष्ट केले आहे. त्यांच्या या पत्रानंतर पक्षासह राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.
बाळासाहेब थोरात यांनी लिहलेल्या या पत्रामुळे पटोले आणि थोरात यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे आता थोरातांच्या बाजूने पटोले यांच्यावर कारवाई होणार की, पटोले यांची बाजू घेत थोरात यांचे विधिमंडळातील गटनेते पद जाणार की दोन्ही नेत्यांची पदे जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
तर बाळासाहेब थोरात यांनी सत्यजित तांबे आणि सर्व घडामोडींवर दोन दिवसांपूर्वी भाष्य केलं. बोलताना थोरात म्हणाले की, जे राजकारण झालं ते मला व्यथित करणारे आहे. ही वस्तुस्थिती आहे. या बाबतीतील माझ्या भावना मी पक्षश्रेष्ठींना कळवल्या आहेत. हे पक्षीय राजकारण आहे. याबद्दल बाहेर बोललं पाहिजे असं नाही या मताचा मी आहे. म्हणून याबाबत मी पक्षश्रेष्ठींना कळवलं आहे. याबतीत पक्ष आणि मी मिळून योग्य त्या प्रकारे निर्णय घेऊ. बाकी लोकांनी याबाबत विचार करण्याची गरज नाही असंही त्यांनी म्हंटलं आहे.
या संपूर्ण घडामोडीनंतर काँग्रेस हायकमांड आणि पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार याकडे सर्वांच लक्ष असणार आहे.