कबड्डी देशाबाहेर पोचविण्याचा पवारसाहेबांचा प्रयत्न अफलातून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

बारामती - ‘‘पवारसाहेब मुख्यमंत्री होते आणि मी होतो भारतीय कबड्डी संघाचा कॅप्टन...समोर उभा होता बांगलादेशचा संघ...साहेबांनी एक तासभर सामना थांबून पाहिला आणि बांगलादेशचा संघ भारी गुणांनी पराभूत होणार असे दिसताच हा सामना कमी फरकाच्या गुणांनी जिंका, असा अनाहूत सल्ला त्यांनी दिला. आम्ही चक्रावलो; मात्र कबड्डी देशाबाहेर न्यायची असेल, तर परदेशी खेळाडूंना त्यात इंटरेस्ट वाटले पाहिजे, कबड्डीशी नाते जुळले पाहिजे, म्हणून जिथे कबड्डी जन्माला आली त्या ठिकाणी पालकाची भूमिका घेण्याचा त्यांचा प्रयत्न अफलातून होता...’’

अर्जुन पुरस्कारप्राप्त कबड्डीपटू शांताराम जाधव यांनी शरद पवार यांच्या कबड्डीच्या मार्केटिंगच्या प्रयत्नांना गुरुवारी अशा शब्दांत उजाळा दिला.

आज जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांच्या पुढाकारातून सृजन सुपर ट्‌वेंटी यूथ कबड्डी स्पर्धेची बारामती विभागीय फेरी सुरू झाली. या वेळी शांताराम जाधव उपस्थित होते. रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना ही आठवण सांगितली. 

जाधव म्हणाले, ‘‘बांगलादेशचा संघ पाच सामने खेळणार होता. मुख्यमंत्री या नात्याने पवारसाहेब आले होते. तेव्हा त्यांनी त्या देशातल्या खेळाडूंनाही कबड्डीविषयी इंटरेस्ट निर्माण झाला पाहिजे, जिथे कबड्डी जन्माला आली, त्याच भागात आम्ही खूप चांगले खेळलो. त्यामुळे हा खेळ अतिशय चांगला आहे, असे त्यांनाही वाटले पाहिजे, त्यातूनच आपल्याला आपली कबड्डी बाहेरच्या देशात नेण्याचे प्रयत्न सोपे होतील, असे स्पष्ट केले आणि खरोखरच भारताबाहेर कबड्डी पोचविण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. त्यांच्यामुळेच माझ्यासारखे खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत खेळू शकले. खेळाबाबत त्यांचा दृष्टिकोन असा अफलातून होता. कबड्डी हा खरेतर मातीवरचा खेळ; मात्र तो मॅटवर नेऊन त्याला राजमान्यता मिळाली पाहिजे, यासाठी पवारसाहेबांनी खूप योगदान दिले. कबड्डी ऑलिंपिकसाठी पात्र ठरावी याचे प्रयत्न सुरू आहेत. कदाचित येत्या दोन वर्षांत त्याची फळे दिसतील; मात्र ती रुजविण्याचे श्रेय पवारसाहेबांना जाते,’’ असेही जाधव म्हणाले.

Web Title: baramati news Kabaddi