Loksabha 2019 : बारामतीत दुपारी तीननंतर मतदानाला वेग

Loksabha 2019 : बारामतीत दुपारी तीननंतर मतदानाला वेग

बारामती शहर - बारामती विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीसाठी आज शांततेत मतदान पार पडले. कोठेही कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती शासकीय सूत्रांनी दिली. आज सकाळी सहा वाजता पोलिंग एजंटसमोर मॉकपोल करून मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली. सात वाजता मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व प्रतिनिधी यांनी प्रारंभी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी बारापर्यंत मतदानाला वेग होता.

दुपारनंतर उन्हाच्या तीव्रतेने मतदानावर काहीसा परिणाम झाल्याचे चित्र दिसले. मात्र दुपारी तीननंतर पुन्हा मतदानाने वेग घेतला होता. यंदा व्हीलचेअरच्या सुविधेमुळे ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांची चांगली सोय झाली. मतदान केंद्रावर पाळणाघराची सुविधा असली, तरी त्याचा वापर कुणी केला नाही. दुपारी तीन वाजेपर्यंत लोकसभा मतदारसंघात सरासरी ४२ टक्के मतदान झाले होते. यातही बारामती विधानसभा मतदारसंघ आघाडीवर होता. उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी निवडणूक व्यवस्थित पार पाडावी, यासाठी पुरेशी उपाययोजना केली होती. 

बारामती परिसरात दिवसभरात...
  अंशुमालिन स्वप्नील शहा हा खास सिंगापूरहून बारामतीला मतदानासाठी आला होता. त्याने प्रथमच मतदानाचा हक्क बजावला.
  बारामतीतील भिगवण चौक, बालक मंदिर सिनेमा रोड परिसरातील दुकाने पोलिसांनी जबरदस्तीने बंद केल्याचा दुकानदारांचा आरोप. 
  सुप्रिया सुळे, प्रतिभा पवार यांनी बारामतीत रिमांडहोम येथे; तर अजित पवार, सुनेत्रा पवार यांनी काटेवाडीत मतदानाचा हक्क बजावला. 
  वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नवनाथ पडळकर यांनी तांदूळवाडीत मतदानाचा हक्क बजावला.
  बारामतीत कोठेही अनुचित प्रकार नाही, सर्वत्र शांततेत मतदान पार पडले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com