‘विरोधात संदेश जाणार नाही याची खबरदारी घ्या’ - देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

विधानसभा निवडणूक काही दिवसांवर आल्यामुळे सरकारच्या विरोधात कोणताही संदेश जनतेमध्ये जाणार नाही. याची खबरदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री यांनी आणाभाका घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यातील पूरस्थितीबाबत आढावा घेण्यासाठी आज मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती.

मुंबई - विधानसभा निवडणूक काही दिवसांवर आल्यामुळे सरकारच्या विरोधात कोणताही संदेश जनतेमध्ये जाणार नाही. याची खबरदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री यांनी आणाभाका घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यातील पूरस्थितीबाबत आढावा घेण्यासाठी आज मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. या बैठकीत सांगली-कोल्हापूर-सातारा या जिल्ह्यांसह राज्यातील इतर ठिकाणी आलेल्या पुराबाबत चर्चा करण्यात आली.

राज्यात आलेल्या पुराचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने ६ हजार ८०० कोटी रुपये इतकी आर्थिक मदत केंद्राकडे मागितली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कोकणात आलेल्या महापुरामुळे झालेल्या नुकसानीवर मात करण्यासाठी सर्व मंत्र्यांनी एकमताने काम करावे. तसेच परस्परातील विसंवाद टाळावा. सरकारची प्रतिमा मलिन होईल, जनतेच्या मनात रोष निर्माण होईल, अशी विधाने करू नयेत, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे समजते. 

मंत्रिमंडळ बैठकीला भाजप आणि शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांना बोलावले होते. मागील कित्येक महिन्यांत मंत्रिगटाची बैठक बोलावली नव्हती. मात्र, राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी ही मंत्रिगटाची बैठक बोलावली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Be careful not to over message Devendra Fadnavis Politics