पाणी, चारा याबाबत दक्ष राहा 

पाणी, चारा याबाबत दक्ष राहा 

पुणे - जिल्ह्यातील नागरिकांना टंचाईच्या झळा जाणवणार नाहीत, यासाठी तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांनी दक्ष राहावे. टंचाई काळात जे अधिकारी दुर्लक्ष करतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी रविवारी दिला. पिण्याच्या पाण्याचे टॅंकर, जनावरांना चारा याबाबत समन्वयाने काम करा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी राम यांनी दिल्या.

जिल्ह्यातील टंचाईचा आढावा बैठक झाली. त्या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी या सूचना दिल्या. या वेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, संग्राम थोपटे, सुरेश गोरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते, सहायक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुधीर जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे आदी उपस्थित होते.

पिण्याच्या पाण्याची परिस्थिती कशी आहे, चारा उपलब्धतेचे प्रमाण, नरेगांतर्गत कामाची स्थिती, उपलब्धतता याची विस्तृत माहिती या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. उपविभागीय अधिकाऱ्यांनी दर आठवड्याला गटविकास अधिकारी, तहसीलदार आणि लोकप्रतिनिधी यांची टंचाईविषयक आढावा बैठक घ्यावी, क्षेत्रीय स्तरावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेऊन जनतेच्या समस्या, मागण्या समजावून घ्याव्यात, त्यानुसार टॅंकरचे प्रस्ताव पाठवावेत. जिल्हाधिकारी स्तरावर टॅंकरचे प्रस्ताव तत्काळ मंजूर केले जातात, असेही ते म्हणाले. 

नळ पाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती करून पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न सुटत असेल, तर तसे प्रस्ताव पाठवण्यासही सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, ‘टंचाईच्या कामात दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. टंचाईनिवारणासाठी शासनाने अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत, याची माहिती ग्रामपंचायत स्तरावर देण्यात यावी,’

खासदार आढळराव पाटील यांनीही टंचाईनिवारणासंदर्भात उपयुक्‍त सूचना केल्या. यंदाची टंचाईपरिस्थिती वेगळी असून सर्वांच्या सहकार्याने यावर मात करू, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला. तर वळसे पाटील यांनीही पाण्याचे टॅंकर, चाराटंचाई, पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती याबाबत सूचना केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com