Kasba Bypoll Election : मतमोजणीआधीच बॅनरबाजी! दोन्ही उमेदवारांच्या विजयाच्या बॅनरमुळे चर्चेला उधाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kasba Bypoll Election

Kasba Bypoll Election : मतमोजणीआधीच बॅनरबाजी! दोन्ही उमेदवारांच्या विजयाच्या बॅनरमुळे चर्चेला उधाण

पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या पुण्यातल्या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये रविवारी मतदान पार पडलं. तर मतमोजणी गुरूवारी म्हणजेच 2 मार्चला होणार आहे, पण मतमोजणीच्या आधीच काँग्रेस आणि भाजपच्या उत्साही कार्यकर्त्यांनी बॅनरबाजीला सुरूवात केली आहे.

रवींद्र धंगेकर पाठोपाठ हेमंत रासने यांचे देखील निकालाच्या आधीच विजयाचे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. कसबा पेठेतील दोन्ही उमेदवाराच्या विजयाचे फ्लेक्स लावण्यात आल्यामुळे ही निवडणूक पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. कसबा पोट निवडणुकीच्या निकाला आधीच भाजप आणि महाविकास आघाडीकडून उमेदवाराच्या विजयाचे बॅनर लावल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.

Banner

Banner

पुण्यात पोट निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच बॅनरबाजी सुरू झाल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. पुण्यातील मुख्य वस्तीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांची आमदार पदी निवड झाल्याचे बॅनर झळकले आहेत. सारसबाग आणि वडगाव चौकात रवींद्र धंगेकर आमदार पदी निवड झाल्याचे कार्यकर्त्यांनी निकाला आधीच बॅनर लावले आहेत.

पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्ही ठिकाणी भाजपचे आमदार होते. पण चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक लागली.कसब्यामधून भाजपचे हेमंत रासने विरुद्ध काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर अशी लढत होती. तर चिंचवडमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली. चिंचवडमध्ये भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली होती. तर राष्ट्रवादीने नाना काटे यांना रिंगणात उतरवलं. अपक्ष म्हणून राहुल कलाटेही रिंगणात उतरले होते.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 50.06 टक्के मतदान झालं आहे. या मतदारसंघामध्ये एकूण 2,75,679 एवढे मतदार आहेत, यातल्या 1,38,018 जणांनी मतदानाचा हक्क बजावला, यापैकी 74,218 पुरुष आणि 63,800 महिलांचा समावेश होता. दुसरीकडे चिंचवड विधानसभेमध्येही 50.47 टक्के मतदान झालं आहे.

टॅग्स :puneBannerelection pune