वाहनधारकांनी महिन्यातून एक दिवस बसचा वापर करावा - रेवण्णा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 नोव्हेंबर 2017

वाहनधारकांनी किमान महिन्यातून एक दिवस परिवहन बसेसचा वापर करावा. यामुळे प्रदुषणमुक्त बेळगावसही सर्वजण सहाय्यभूत ठरतील, असे आवाहन परिवहन मंत्री एच. डी. रेवण्णा यांनी केले. 

बेळगाव - मध्यवर्ती बसस्थानकाचा विकास वेळेत केला जात असून बससेवा सुधारण्याच्या दृष्टीने शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. परिवहन मंडळ जनस्नेही केले जात असून वाहनधारकांनी किमान महिन्यातून एक दिवस परिवहन बसेसचा वापर करावा. यामुळे प्रदुषणमुक्त बेळगावसही सर्वजण सहाय्यभूत ठरतील, असे आवाहन परिवहन मंत्री एच. डी. रेवण्णा यांनी केले. 

वायव्य परिवहन मंडळाने सोमवारी बस डे उपक्रमाची बेळगाव परिवहन विभागात सुरवात केली. मंत्री रेवण्णा यांनी हिरवा झेंडा दाखवून उपक्रमाची सुरवात केली. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वायव्य परिवहन मंडळाचे अध्यक्ष सदानंद डंगण्णावर होते. प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री आर. व्ही. देशपांडे होते. ते म्हणाले, पर्यावरणाच्या दृष्टीने वायू प्रदुषण कमी करणे महत्वाचे असून यासाठी खासगी वाहनधारकांनी परिवहन सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. यानंतर सीबीटी ते सुवर्णसौध बसमधून मंत्री आणि लोकप्रतिनीधींनी तिकीट काढून प्रवास केला. 

बंगळूर महानगर परिवहन मंडळाचे अध्यक्ष नागराज यादव, सरकारचे मुख्य सचेतक अशोक पट्टण, वायव्य परिवहन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पांडुरंग नायक, कारंजीमठाचे सिद्धराम स्वामी, कॉंग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, शहर जिल्हाध्यक्ष राजू सेठ, बसवराज शेगावी, परिवहन मंडळ विभागीय नियंत्रक गणेश राठोड, परिवहन अधिकारी बी. डी. जाधव, कार्यकारी अभियंता विजयकुमार आदी उपस्थित होते. 
 

Web Title: Belgaum News Bus Day in city