जिल्हा मागणीसाठी चिक्कोडीत कडकडीत बंद

चिक्कोडी - जिल्हा मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी झालेले आंदोलनाचे नेते बी. आर. संगाप्पगोळ, रामा माने व इतर.
चिक्कोडी - जिल्हा मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी झालेले आंदोलनाचे नेते बी. आर. संगाप्पगोळ, रामा माने व इतर.

चिक्कोडी - चिक्कोडी जिल्हा मागणी आंदोलनाला आज शुक्रवारी (ता.23) 19 दिवस लोटले असून सर्वसामान्य जनता, विविध समाज, संघ, संघटना यांचा वाढता पाठींबा आहे. आज आंदोलकांनी पुकारलेल्या चिक्कोडी बंदला शहरातील नागरिकांनी भरघोस पाठींबा व्यक्त करीत कडकडीत बंद पाळला. 

गेल्या 19 दिवसांपासून चिक्कोडी जिल्हा मागणीसाठी आंदोलन सुरु असूनही राज्य शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी (ता.23) आंदोलनाचे नेते बी. आर. संगाप्पगोळ यांनी चिक्कोडी बंदची हाक दिली होती. जिल्हा मागणी आंदोलन आता वेगळ्या वळणावर पोहचले असून स्वतंत्र जिल्ह्याशिवाय आता माघार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. या आंदोलनाला विविध पक्षाच्या नेत्यांनी, मराठी, कन्नड, दलित, व्यापारी, सरकारी तालुका व जिल्हा नोकर संघटना, विविध कलासंघटना, विद्यार्थी संघटना, तालुका मराठा समाज व अखिल भारत क्षत्रिय मराठा महासंघ यांचा पाठींबा लाभला आहे. 

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व लोकांच्या चिक्कोडी जिल्हा मागणीप्रती असलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी चिक्कोडी बंदची हाक देण्यात आली होती. सकाळपासूनच शहरातील बससेवा व दुकाने, शासकीय कार्यालये, संघ-संस्था, शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. नेहमी नागरिकांनी गजबजणारी बाजारपेठ आणि बसस्थानक परिसरात शुकशुकाट होता. बंदमुळे शहरातील कोट्यवधी रुपयाचे व्यवहार ठप्प झाले.
आंदोलकांनी आंदोलनस्थळापासून बसव सर्कल, निपाणी-मुधोळ राज्य महामार्ग, बसस्थानक, के. सी. रोड, डंबळ खुट, अंकली खुट, सोमवारपेठमार्गे बसवसर्कलपर्यंत भव्य मोर्चा काढला. त्यात जिल्हा मागणीच्या व राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. येथे मानवी साखळीही केली होती.

आंदोलनात विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, बसवप्रसाद जोल्ले, जगदीश कवटगीमठ, माजी नगराध्यक्ष रामा माने, राष्ट्रीय माजी सैनिक समन्वय समितीचे राज्याध्यक्ष बाळासाहेब सांग्रोळे, वकील संघटनेचे अध्यक्ष कलमेश किवड, विजयभास्कर इटीगोणी, ऍड. प्रकाश आणवेकर, त्यागराज कदम, संजय बडिगेर, नागेश माळी, चंद्रकांत हुक्केरी, एस. वाय. हंजी यांच्यासह विद्यार्थी, युवक व आंदोलक उपस्थित होते.

अल्लमप्रभू स्वामी अस्वस्थ

बंदनिमित्त काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी झालेल्या चिंचणी येथील सिध्द संस्थान मठाचे अल्लमप्रभू स्वामी यांना थकव्यामुळे अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना विश्रांती घ्यावी लागली. तसेच एक विद्यार्थिनी देखील अस्वस्थ झाली होती. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com