बेळगावात मोटारी जाळणारा संशयित डॉक्‍टर ताब्यात 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

बेळगाव - घरासमोर पार्क केलेल्या मोटारींना आग लावून शहरात दहशत माजविणाऱ्या संशयित तरुणाला पोलिसांनी गुरुवारी (ता. 18) अटक केली. अमित विजयकुमार गायकवाड (वय 37, सध्या रा. सदाशिवनगर, मूळ रा. प्रगतीनगर, गुलबर्गा) असे संशयिताचे नाव आहे.

बेळगाव - घरासमोर पार्क केलेल्या मोटारींना आग लावून शहरात दहशत माजविणाऱ्या संशयित तरुणाला पोलिसांनी गुरुवारी (ता. 18) अटक केली. अमित विजयकुमार गायकवाड (वय 37, सध्या रा. सदाशिवनगर, मूळ रा. प्रगतीनगर, गुलबर्गा) असे संशयिताचे नाव आहे. हा तरुण एमबीबीएस एमडी पदवीधारक असून सध्या तो बिम्स्‌ कॉलेजच्या रक्त पुरवठा विभागात मुख्य अधिकारी म्हणून काम पाहतो, ही माहिती डीसीपी सीमा लाटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

डीसीपी लाटकर म्हणाल्या, बुधवारी पहाटे 3.30 ते 4.30 या वेळेत सात मोटारींना आग लावल्याचा प्रकार जाधवनगर परिसरात घडला, तर याच दिवशी सायंकाळी 7.30 ते 9.30 या काळात विनायकनगर व कॅम्प परिसरात तीन किंमती मोटारी पेटविल्याचे उघडकीस आले. दिवसभर पोलिसांकडून शोध सुरू होता. शिवाय शहरात याची चर्चा देखील सुरू होती. यानंतर रात्रीच्या वेळी विश्‍वेश्‍वरय्यानगर येथे एक संशयित तरुण आपली मोटार लावून एका मोटारीजवळ घुटमळत होता.

येथील सुरक्षारक्षकाला संशय आल्याने त्याने येथील लोकांना बोलावून घेऊन संशयिताला पकडले व पोलिसांना बोलावून घेतले. हा तरुण म्हणजे डॉ. अमित गायकवाड असल्याचे स्पष्ट झाले. 

पेटविण्याचे साहित्य जप्त 
डॉ. अमितची मोटार (केए 22 एन 6244) जप्त केली तेव्हा मोटारीतून धक्कादायक साहित्य जप्त झाले. यामध्ये पाच मोबाईल, एक लायटर, कापराची पाच पाकिटे व दोन डब्या, दोन चाकू, कात्री, हातोडा, दोन धारदार लोखंडी पंच, इंजिन ऑईल, स्पिरीट असलेल्या बाटल्या, डिझेलचे कॅन व बोळे बनविण्यासाठी वापरण्यात येणारे टाकाऊ दोऱ्याचे गोळे असे साहित्य आढळून आले. या सर्व मोटारी अमितने पेटविल्या आहेत हे पोलीस अद्याप स्पष्ट सांगत नाहीत. परंतु, एका मोटार मालकिणीने त्याला पाहिले आहे, शिवाय एकूण पुरावे व सीसीटीव्हीतील हालचालीवरून या सर्व मोटारी अमितनेच पेटविल्या असल्याचे संशय असल्याचा दावा डीसीपी लाटकर यांनी केला आहे. 

मानसिक अस्वास्थ्यातून 
डॉ. अमितने हे सर्व कृत्य मानसिक अस्वास्थ्यातून केल्याचे बिम्स्‌ व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. गेल्या महिनाभरापासून त्याची मानसिक स्थिती बिघडली असल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ. अमितना महिनाभर सक्तीच्या रजेवर पाठविल्याचे बिम्स्‌चे संचालक डॉ. एस. टी. कळसद यांनी सांगितले.

Web Title: Belgaum News Doctor arrested in motor burn case