बेळगावत सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन

मिलिंद देसाई
बुधवार, 17 जानेवारी 2018

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 17 जानेवारी 1956  रोजी हुतात्मा झालेल्यांना महाराष्ट्र एकिकरण समितीच्यावतीने बुधवारी विनम्र अभिवादन करण्यात आले.

बेळगाव - संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात पहिले रक्त बेळगावात सांडले, जगाच्या पाठीवर सनदशीर मार्गाने 63 वर्षे लढला जाणारा सीमाप्रश्नाचा लढा हा न्यायाचा असून महाराष्ट्रातील जनता सीमावाशियांच्या पाठीशी आहे. येणाऱ्या काळात मराठी जनतेला न्याय नक्कीच मिळेल. बेळगावातील मराठी भाषिकांवर ज्या ज्या वेळी अन्याय होतो तेंव्हा त्याचे पडसाद कोल्हापूरात उमटतात असे प्रतिपादन कोल्हापूर येथील मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक यांनी केले.                                

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 17 जानेवारी 1956  रोजी हुतात्मा झालेल्यांना महाराष्ट्र एकिकरण समितीच्यावतीने बुधवारी विनम्र अभिवादन करण्यात आले. प्रारंभी महापौर संज्योत बांदेकर , आमदार संभाजी पाटील, शहर समिती अध्यक्ष दीपक दळवी, माजी महापौर मालोजी अष्टेकर, कोल्हापूर येथील वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, संभाजी जगदाळे यांच्या नगरसेवक व कार्यकर्त्यांनी पुष्य अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर रामदेव गल्ली, खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, अणसुरकर गल्ली व किर्लोस्कर रोड परिसरातून फेरी काढण्यात आली. यावेळी बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, हुतात्मे अमर रहे आदी घोषणा देण्यात आल्या.

Web Title: Belgaum News Hutatma Day