शरद पवार यांच्या सभेची बेळगावात जोरदार तयारी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 मार्च 2018

बेळगाव - सीमाप्रश्‍नी ज्या ज्या वेळी अडचणी आल्या, त्या प्रत्येकवेळी  माजी केंद्रीयमंत्री शरद पवार सीमावासियांच्या पाठीशी राहिले आहेत. राष्ट्रीय पातळीवर ते मोठे नेते असून सीमावासियांबाबत त्यांना प्रचंड आस्था आहे. त्यामुळे त्यांची सभा यशस्वी करून आपल्यातील लढाऊ बाणा संपूर्ण देशभरात पोचविण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन मध्यवर्ती आणि शहर महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले. 

बेळगाव - सीमाप्रश्‍नी ज्या ज्या वेळी अडचणी आल्या, त्या प्रत्येकवेळी  माजी केंद्रीयमंत्री शरद पवार सीमावासियांच्या पाठीशी राहिले आहेत. राष्ट्रीय पातळीवर ते मोठे नेते असून सीमावासियांबाबत त्यांना प्रचंड आस्था आहे. त्यामुळे त्यांची सभा यशस्वी करून आपल्यातील लढाऊ बाणा संपूर्ण देशभरात पोचविण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन मध्यवर्ती आणि शहर महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले. 

म. ए. समितीतर्फे 31 मार्च रोजी सायंकाळी चार वाजता सीपीएड्‌ मैदानावर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे. यासाठी रविवारी (ता. 18) सकाळी सभेसाठी व्यासपीठ उभारणीसाठी आरेखन आणि मैदानाची पाहणी समिती नेत्यांनी केली. त्यानंतर श्री. दळवी कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. 

ते म्हणाले, सीमाप्रश्‍नी आजतागायत अनेकांनी योगदान दिले आहे. त्यामध्ये शरद पवार यांचे नाव अग्रभागी आहे. गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ सीमाप्रश्‍नाच्या सोडवणुकीसाठी सीमावासी लढा देत आहेत. या लढ्यात शरद पवार यांचे सक्रीय योगदान राहिले असून सीमावासियांबाबत त्यांना आत्मीयता आहे. त्यामुळेच हा प्रश्‍न सोडविण्यासाठी त्यांनी अनेकदा प्रयत्न केले आहे. त्यांनी स्वत:हून बेळगावात समितीसाठी जाहीर सभा घेण्याची इच्छा व्यक्‍त केल्यामुळे 31 मार्च रोजी जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे ही सभा यशस्वी करण्याची जबाबदारी प्रत्येक मराठी माणसाच्या खांद्यावर आहे. 

प्रारंभी सभेचे व्यासपीठ, लोकांच्या बैठकीची सोय, येण्या-जाण्यासाठी मार्ग याबाबत मैदानाची पाहणी करून व्यासपीठ उभारणीसाठी आरेखन करण्यात आले. मध्यवर्तीचे कार्याध्यक्ष, माजी आमदार मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील, नगरसेविका सरिता पाटील, राजेंद्र मुतकेकर, आर. आय. पाटील, विकास कलघटगी, कल्लाप्पा घाटेगस्ती, दत्ता उघाडे, रामचंद्र मोदगेकर, मनोहर होसुरकर, रणजित चव्हाण-पाटील, टोपाण्णा पाटील, प्रकाश पाटील, राजू मरवे, बी. डी. मोहनगेकर, संतोष मंडलिक, मयूर बसरीकट्टी, राजू किणयेकर, अमित देसाई, एल. डी. बेळगावकर, चेतक कांबळे, पुंडलिक पट्टण आदी उपस्थित होते. 

कारवार, बिदरकडेही जागृती 
31 मार्च रोजी बेळगावात होणाऱ्या शरद पवार यांच्या जाहीर सभेबाबत कारवार, बिदर, भालकी आदी भागातही जागृती करण्यात येत आहे. तेथील कार्यकर्त्यांत मोठ्या प्रमाणात उत्सुकता असून सभा अतिशय शिस्तबध्द करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही मध्यवर्ती व शहर समिती अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले. 
 

Web Title: Belgaum News Sharad Pawar programm in Belgaum