यंदा प्रथमच निपाणीतून सौंदत्तीला तिकीट दरातही बस 

विकास पाटील
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

निपाणी - सौंदत्ती येथील रेणुकादेवी यात्रेला 2 जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे. ही यात्रा 31 जानेवारी अखेर चालणार आहे. यात्रेसाठी प्रासंगिक करारावर निपाणी आगारातून बस दिल्या जात आहेत. तसेच आता कर्नाटकासह महाराष्ट्रातील ज्या-त्या गावातून सौंदत्तीला जाण्या-येण्यासाठी तिकीटाच्या दरात बससेवा उपलब्ध केली आहे.

निपाणी - सौंदत्ती येथील रेणुकादेवी यात्रेला 2 जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे. ही यात्रा 31 जानेवारी अखेर चालणार आहे. यात्रेसाठी प्रासंगिक करारावर निपाणी आगारातून बस दिल्या जात आहेत. तसेच आता कर्नाटकासह महाराष्ट्रातील ज्या-त्या गावातून सौंदत्तीला जाण्या-येण्यासाठी तिकीटाच्या दरात बससेवा उपलब्ध केली आहे. त्यामुळे भाविकांची बसमागे तीन ते साडे तीन हजार रूपयांची बचत होणार आहे. 

भाविकांच्या गावापासून निपाणी, सोगल सोमनाथ, पंतबाळेकुंद्री, मुगळखोड, अलकनूर, मायाक्का चिंचली, मंगसुळी खंडोबा, नृसिंहवाडी, ही ठिकाणी दाखवून पुन्हा बस परतीच्या प्रवासास निघणार आहे. यंदा निपाणी आगाराने हा नवीन उपक्रम सुरु केल्याने प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे. तसेच प्रवाशांना यंदा सात जादा तीर्थक्षेत्रांचा लाभ मिळणार आहे. गावातून किमान 40 प्रवासी आवश्‍यक आहेत. त्यासाठी केवळ 2 हजाराची अनामत असून ती रक्कम तिकिटातून वजा होणार आहे. या शिवाय निपाणी आगारातून अतिरिक्त बसही सोडल्या जाणार आहेत. 

यंदा प्रासंगिक कराराच्या बसगाड्यांना निपाणी आगाराने चालक भत्ता, वाहतूक कर, खोळंबा आकार रद्द केल्याने भाविकांतून समाधानाचे वातावरण आहे. सर्व भाविकांना 55 आसनांची कॅरेजची (सिडी) बस दिली जाणार असल्याने सर्व साहित्य बसच्या टपावर ठेवण्यासाठी सोयीचे होणार आहे. आगाराच्या वतीने महाराष्ट्रातील गावातून आरक्षण सुरु असून त्यासाठी पथक नेमले आहे. ज्या गावातून भाविक सौंदत्तीला जाणार आहेत, त्यांना आगारातील अधिकारी तेथे जावून मार्गदर्शन करत आहेत. त्याचाही परिणाम उत्पन्न वाढीवर होणार आहे. 

महाराष्ट्र बसच्या तुलनेत यंदा प्रवाशांना तीन-साडेतीन हजाराचा फायदा होणार आहे. आसन क्षमता वाढविली आहे. सर्व भाविकांना कॅरेजच्या बस दिल्या जाणार आहेत. त्यामुळे आरामदायी प्रवास होणार आहे.
-एस. संदीपकुमार, 

आगार व्यवस्थापक, निपाणी 

प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन यंदा प्रथमच किलो मीटरला तीन रुपये दर कमी केला आहे. तसेच तिकीट दरानुसार त्यांना बस दिली जात आहे. त्यामुळे भाविकांची संख्या वाढण्याची शक्‍यता असून आर्थिक उत्पन्नही वाढणार आहे.
-एस. चंद्रशेखर, 

विभागीय नियंत्रणाधिकारी, चिक्कोडी 

Web Title: Belgaum News special bus for Saundatti