दुप्पट खर्च; तरी सुवर्णसौध भ्रष्टाचारमुक्‍त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

बेळगाव - सुवर्णसौध बांधकाम खर्चात दुप्पट वाढ झाल्याने त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्याची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने नुकताच आपला अहवाल सरकारला सादर केला असून बांधकामात भ्रष्टाचार झाला नसल्याचा दावा केला आहे.

बेळगाव - सुवर्णसौध बांधकाम खर्चात दुप्पट वाढ झाल्याने त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्याची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने नुकताच आपला अहवाल सरकारला सादर केला असून बांधकामात भ्रष्टाचार झाला नसल्याचा दावा केला आहे.

सुवर्णसौधसाठी पहिल्यांदा २३० कोटी रुपयांचा कृती आराखडा बनवला होता. मात्र बांधकाम पूर्ण होईपर्यंत ४३८ कोटी रुपयांचा निधी खर्च झाला होता. हा खर्च जवळपास दुप्पट होता. त्यामुळे कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला. राज्यात २००८-०९ मध्ये बी. एस. येडियुराप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार असताना काँग्रेसने याची चौकशी केली जावी, अशी मागणी उचलून धरली होती. त्याची दखल घेत सरकारने चौकशी समिती नेमली. राज्य सरकारचे अतिरिक्त सचिव टी. एम. भास्कर यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली. पण समितीने तब्बल पाच वर्षांनी अहवाल सादर केला आहे. कामाच्या खर्चात वाढ झाली असली तरी वाढीव खर्चासाठी वेळोवेळी मंजुरी घेण्यात आली. त्यामुळे सुवर्णसौध बांधकामात गैरव्यवहार झाला नसल्याचे भास्कर यांनी सांगितले.

व्हॅक्‍सिन डेपो परिसरात सुवर्णसौध बांधण्याचा निर्णय धजद-भाजप युती सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी घेतला होता. पण पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील परिसर आणि वाहतूक कोंडीची भीती व्यक्त करत ठिकाणात बदल करण्यात आला. नंतर हलगा-बस्तवाडमधील १२० एकर जमीन संपादित केली. २००९ मध्ये सुवर्णसौध बांधकामाला प्रारंभ झाला व २०१२ मध्ये बांधकाम पूर्ण झाले. ११ ऑक्‍टोबर २०१२ रोजी सुवर्णसौधचे उद्‌घाटन झाले. इमारतीच्या कामासाठी २३० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती दिली. पण काम पूर्ण होण्यास सुमारे साडेतीन वर्षे लागली. या काळात खर्चात वाढ झाल्याने भ्रष्टाचाराचा आरोप झाला होता. पण चौकशी अहवालात भ्रष्टाचार झाला नसल्याचे स्पष्ट 
झाले आहे.

Web Title: Belgaum News SuvarnSoudh Corruption free