निपाणीत सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन 

राजेंद्र हजारे
बुधवार, 17 जानेवारी 2018

निपाणी - भाषावार प्रांतरचना झाल्यापासून कर्नाटक शासनाकडून सीमाभागातील मराठी भाषिकांवर अन्याय होत आहे. त्याविरोधात सर्वांनी एकत्रित येऊन लढा दिला पाहिजे. राजकारण विरहीत प्रयत्न केल्यास निश्‍चित न्याय मिळणार आहे. यापुढील काळातही संपूर्ण महाराष्ट्र सीमाभागाच्या पाठीशी राहिल, अशी ग्वाही कोल्हापूरच्या महापौर स्वाती यवलुजे यांनी दिली. 

निपाणी - भाषावार प्रांतरचना झाल्यापासून कर्नाटक शासनाकडून सीमाभागातील मराठी भाषिकांवर अन्याय होत आहे. त्याविरोधात सर्वांनी एकत्रित येऊन लढा दिला पाहिजे. राजकारण विरहीत प्रयत्न केल्यास निश्‍चित न्याय मिळणार आहे. यापुढील काळातही संपूर्ण महाराष्ट्र सीमाभागाच्या पाठीशी राहिल, अशी ग्वाही कोल्हापूरच्या महापौर स्वाती यवलुजे यांनी दिली. 

बुधवारी (ता. 17) येथे आयोजित हुतात्मा दिन कार्यक्रमात अभिवादन करून बोलत त्या होत्या. अध्यक्षस्थानी गणी पटेल होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना सहसंपर्क प्रमुख प्रा. सुनील शिंत्रे व कोल्हापूर जिल्हा शिवसेनेचे उपप्रमुख सुजय चव्हाण उपस्थित होते. 

हुतात्मा दिनी बुधवारी (ता. 17) शहर परिसरात "बंद" ठेवून हरताळ पाळण्याचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेनेसह मराठी भाषिकांनी केले होते. त्यास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अशोकनगर, बसस्थानक, साखरवाडी, बसस्थानकासह शहरातील व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवले होते. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट दिसत होता. बंदच्या पार्श्‍वभूमीवर मोठा पोलिस फौजफाटा तैनात केला होता. 

बेळगाव नाक्‍यावरील नाथ पै चौकात नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, सभापती नजहत परवीन मुजावर यांच्या हस्ते बॅ. नाथ पै. यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. नगरपालिकेतर्फे बेळगाव नाक्‍यावर बॅ. नाथ पै यांचे स्मारक उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सीमालढ्यातील हुतात्मा कमळाबाई मोहिते यांच्या वारसांना भूखंड दिला असून तेथे घर बांधण्यासाठी नगरपालिकेचे नाहरकत पत्र देण्याची तयारी दर्शविली. साखरवाडीत हुतात्मा कमळाबाई मोहिते यांना अभिवादन करण्यात आले.

मराठी बांधवांच्या हक्काच्या न्यायासाठी शिवसेना ठाम आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे मराठी भाषिकांची गळचेपी होत आहे. त्या विरोधात आंदोलन व चळवळ उभी केली पाहिजे.

- प्रा. सुनील शिंत्रे

निपाणी भाग म. ए. समिती अध्यक्ष जयराम मिरजकर, मोहन बुडके, प्रा. भारत पाटील, नगरसेवक संजय सांगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सुभाष खाडे, प्रा. राजन चिक्कोडे, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासूद, सुधाकर सोनाळकर, कबीर वराळे, प्रा. एन. आय. खोत, नगरसेवक नितीन साळुंखे, दिलीप पठाडे  उपस्थित होते. 

Web Title: Belgaum News Swati Yavluje comment