चिक्कोडी तालुक्यातील पांगिर-ए जैन मंदिरात 10 लाखाची चोरी

राजेंद्र हजारे
मंगळवार, 23 जानेवारी 2018

निपाणी - पांगिर-ए येथील श्री 1008 नेमिनाथ दिगंबर जैन मंदिरात चोरीची घटना मंगळवारी (ता. 23) सकाळी उघडकीस आली. त्यात चोरट्यांनी देवाच्या अंगावरील 1 लाख 15 हजार रूपये किंमतीचे साडेतीन तोळे सोन्याचे दागिने व 8 लाख 80 हजार रूपये किंमतीच्या 22 किलो चांदीच्या मूर्ती व दागिने असे सुमारे 10 लाखाचे दागिने चोरीस गेले आहेत.

निपाणी - पांगिर-ए येथील श्री 1008 नेमिनाथ दिगंबर जैन मंदिरात चोरीची घटना मंगळवारी (ता. 23) सकाळी उघडकीस आली. त्यात चोरट्यांनी देवाच्या अंगावरील 1 लाख 15 हजार रूपये किंमतीचे साडेतीन तोळे सोन्याचे दागिने व 8 लाख 80 हजार रूपये किंमतीच्या 22 किलो चांदीच्या मूर्ती व दागिने असे सुमारे 10 लाखाचे दागिने चोरीस गेले आहेत. खडकलाट पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

घरफोड्यांनंतर आता अक्कोळपासून जवळच असलेल्या पांगिर-ए येथील जैन मंदिरात चोरीची घटना घडली आहे. त्यामुळे नागरिकांतून भीती व्यक्त होत आहे. सोमवारी रात्री एकनंतर चोरट्यांनी चोरी केल्याचा अंदाज आहे. या काळात काही दुचाकी वाहनांचा आवाजही नागरिकांना आल्याचे सांगण्यात येते. यापूर्वी या मंदिरात वयोवृध्द पंडीत मंडपात रात्रीच्यावेळी वस्तीसाठी येत होते. पण त्यांची तब्येत खालावल्याने चार दिवसापूर्वीच त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यामुळे मंदिरात कोणी नसल्याचे पाहून चोरट्यांनी ही चोरी केली आहे. 

चोरट्यांनी मंदिराच्या दरवाजाची कडी-कोयंडा व कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर मूर्तीवरील पद्मावती देवीचे जोधपुरी छत्र, चौरंग व चांदीच्या दागिन्यांसह चांदीच्या मूर्ती लंपास केल्या. त्या शिवाय मंदिरात असलेल्या कपाटाची कुलूपे तोडून त्यातील काही वस्तू चोरल्या आहेत. यावेळी चोरट्यांनी मंदिर परिसरात असलेल्या शेजारच्या घरात कड्या घातल्या होत्या. त्यामुळे वाहनांचा आवाज येऊनही नागरिकांना बाहेर येता आले नाही. चोरी झाल्यावर चोरट्यांनी सोने, चांदीच्या वस्तू घेऊन पोबारा केला. तर काही वस्तू सोनार मळ्यातील रेणुका मंदिराच्या बाजूला टाकल्या. 

मंदिराच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती खडकलाट पोलिस ठाण्यास दिली. त्यानुसार निपाणीचे मंडल पोलिस निरीक्षक किशोर भरणी, खडकलाट पोलिस स्थानकाचे पोलिस उपनिरीक्षक बसगौडा पाटील, पोलिस उपाधिक्षक दयानंद पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

दुपारी 12 च्या सुमारास बेळगावमधील श्‍वान पथकासह ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. मंदिर ते अक्कोळ पेट्रोल पंपापर्यंत हे श्‍वान घुटमळले. ठसेतज्ज्ञांनी घटनास्थळावरून हाताचे ठसे घेतले असून त्यानुसार लवकरच चोरट्यांचा छडा लागेल, असा विश्‍वास दयानंद पवार यांनी व्यक्त केला आहे. या घटनेची फिर्याद बाहुबली उर्फ प्रवीण पाटील यांनी दिली आहे. 

Web Title: Belgaum News theft of 10 lakh in Pangire Jain Temple