येळ्ळूर मराठी साहित्य संघाचे पुरस्कार जाहीर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

येळ्ळूर - येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघातर्फे दिल्या जाणाऱ्या साहित्यिक व सामाजिक पुरस्कारांची घोषणा  करण्यात आली आहे. यंदा डॉ. सुनीलकुमार लवटे (कोल्हापूर), अशोक देशपांडे (बेळगाव), निशा शिवुरकर (अहमदनगर) यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. येळ्ळूरमध्ये रविवारी (ता. ११) होणाऱ्या १३ व्या साहित्य संमेलनात पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

येळ्ळूर - येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघातर्फे दिल्या जाणाऱ्या साहित्यिक व सामाजिक पुरस्कारांची घोषणा  करण्यात आली आहे. यंदा डॉ. सुनीलकुमार लवटे (कोल्हापूर), अशोक देशपांडे (बेळगाव), निशा शिवुरकर (अहमदनगर) यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. येळ्ळूरमध्ये रविवारी (ता. ११) होणाऱ्या १३ व्या साहित्य संमेलनात पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

राष्ट्रवीरकार शामराव देसाई साहित्यिक पुरस्कार डॉ. सुनीलकुमार लवटे यांना जाहीर झाला असून प्राचार्य अनंत देसाई यांच्यामार्फत हा पुरस्कार दिला जातो. शाल, मानचिन्ह व रोख पाच हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. लवटे हिंदी, मराठी साहित्याचे अभ्यासक, साहित्यिक आहेत. त्यांनी वि. स. खांडेकरांच्या अप्रकाशित व असंकलित साहित्याची २० संपादित पुस्तके प्रकाशित केली आहेत. मराठी आणि हिंदीत त्यांची विपुल ग्रंथसंपदा आहे. 

दिवंगत मारुती पाटील (पेंटर) सामाजिक पुरस्काराचे मानकरी बेळगावचे अशोक देशपांडे आहेत. परशराम पाटील (येळ्ळूर) यांच्यामार्फत हा पुरस्कार देण्यात येतो. शाल, मानचिन्ह व रोख रुपये पाच हजार असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

अशोक देशपांडे यांनी ग्रामीण विकास, ग्राम स्वच्छता अंधश्रद्धा निर्मूलन, सहकार, महिला स्वयंरोजगार यासाठी भरीव कार्य केले आहे. विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांचे समाजसेवेचे कार्य सुरू आहे. सर्वोदयी विचार प्रसारासाठी ते काम करीत आहेत. 
रमाबाई आंबेडकर महिला सामाजिक पुरस्काराच्या मानकरी संगमनेरमधील (अहमदनगर) सामाजिक कार्यकर्त्या निशा शिवुरकर ठरल्या आहेत. दलित संघटनेचे नेते मल्लेश चौगुले (बेळगाव) यांच्यामार्फत हा पुरस्कार देण्यात येतो. शाल, मानचिन्ह व रोख रुपये पाच हजार असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

श्रीमती शिवुरकर यांनी परित्यक्तांच्या प्रश्‍नांवर देशात त्यांनी सर्वप्रथम काम सुरू केले. स्त्रियांच्या प्रश्‍नांसाठी सातत्याने कार्यरत आहेत. असंघटीत कामगार, दुष्काळ व रोजगार याविषयावर काम. समाजवादी जनपरिषदेची स्थापना केली आहे.

येळ्ळूर साहित्य संमेलनाची जय्यत तयारी  
येळ्ळूर - येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघातर्फे आयोजित १३ व्या येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची तयारी सुरू असून रविवारी (ता. ११) दिवंगत रमेश धामणेकर संमेलननगरीत संमेलन भरत आहे. परमेश्‍वरनगरातील मराठी मुलांच्या शाळेच्या पटांगणावर संमेलन होणार असून मंडप उभारणी सुरू झाली आहे. 

संमेलनाध्यक्ष म्हणून ‘साम’ वाहिनीचे संपादक संजय आवटे उपस्थित राहणार आहेत. बेळगावच्या प्रख्यात डॉक्‍टर सोनाली सरनोबत यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‌घाटन होईल. संमेलनाचे स्वागताध्यक्षपद नवहिंदचे अध्यक्ष एल. आय. पाटील यांच्याकडे आहे. पाच सत्रात संमेलन होणार आहे. पहिल्या सत्रात महाराष्ट्र हायस्कूलपासून ग्रंथदिंडी निघणार आहे. त्यानंतर उद्‌घाटन व अध्यक्षीय भाषण होईल. त्यानंतर पुरस्कार वितरण होणार आहे.

दुसऱ्या सत्रात पुरस्कार विजेते मनोगत मांडणार आहेत. तिसऱ्या सत्रात स्थानिक कवींचे संमेलन व कथाकथन स्पर्धेतील विजेत्यांचे कथाकथन होईल. चौथ्या सत्रात होणाऱ्या कविसंमेलनात राधिका फराटे (मुंबई), आबेद शेख (यवतमाळ), विजय काळे (कारदगा) व संजय आवटे (मुंबई) सहभागी होतील. तर पाचव्या सत्रात ‘सैराट’फेम अभिनेता संभाजी तांगडे आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. यावेळी महेश सिद्दाणी (गर्लगुंजी) यांना क्रीडा पुरस्कार तर विष्णू मासेकर (येळ्ळूर) यांना कृषी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे, असे आयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे.

Web Title: Belgaum News Yellur Marathi Sahitya Sangh awards declared