फिरायला जायचंय? ही आहेत या विकेंडसाठी बेस्ट ठिकाणं!

अरविंद तेलकर
शुक्रवार, 14 जून 2019

पावसाळा सुरू झालाय. मुलांच्या शाळा सुरू होण्यापूर्वीचा शेवटचा विकएंड आहे. तर तरूणाईसाठी तर फिरण्याची सुरवात आता झालीय. अशा वेळी प्रश्न पडतो, तो कुठे जायचं? काहींचे ठिकाण आधीच ठरलेलं असतं, काही जण नवीन स्थळाच्या शोधात असतात... त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी अशाच काही खास पर्यटन स्थळांची माहिती घेऊन आलो आहोत. 

वीकएंड पर्यटन 

पावसाळा सुरू झालाय. मुलांच्या शाळा सुरू होण्यापूर्वीचा शेवटचा विकएंड आहे. तर तरूणाईसाठी तर फिरण्याची सुरवात आता झालीय. अशा वेळी प्रश्न पडतो, तो कुठे जायचं? काहींचे ठिकाण आधीच ठरलेलं असतं, काही जण नवीन स्थळाच्या शोधात असतात... त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी अशाच काही खास पर्यटन स्थळांची माहिती घेऊन आलो आहोत. 

भंडारदऱ्यातील निसर्गाची उधळण 
पावसाळ्याची चाहूल लागताच भटक्‍यांना वेध लागतात ताम्हिणी, माळशेज, इगतपुरी, अंबोली अशा अनेकविध पर्यटनस्थळांचे. पावसाचे आणि फेसाळत कोसळणाऱ्या धबधब्यांचे तुषार अंगावर झेलत मनमुराद बागडण्याचे हे दिवस. आकाशाची निळाई आणि धरित्रीच्या अंगा-खांद्यावर सजलेली पाचूसमान हिरवाईनं मन मोहरून जातं. एरवी उन्हाळ्यात रौद्रभीषण वाटणारा सह्याद्री, पावसाळ्यात सखा-जिवलगासमान भासू लागतो. अशाच हिरवाईत दडलंय भंडारदरा. नगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्‍यातलं आणि प्रवरा नदीच्या काठावरचं लोभसवाणं गाव. उंच कडे, हिरवीगार दाट वनश्री, ब्रिटिशकालीन विल्सन धरणाचा अथांग आर्थर जलाशय, धुक्‍याच्या लाटा आणि जोडीला शुद्ध आणि थंड हवा. अशा आल्हाददायक ठिकाणी वेळ कसा पसार होतो, ते समजतच नाही. 

कसे जाल? : पुण्याहून आळेफाटा-नारायणगावमार्गे 172 किलोमीटर, मुंबईहून आसनगाव-कसारा-घोटीमार्गे 165 किलोमीटर. राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसच्याही नियमित फेऱ्या असतात. भंडारदऱ्यामध्ये निवास आणि भोजनाची उत्तम सोय आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची हटमेंट्‌स उपलब्ध आहेत. त्याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभाग, सिंचन विभागाची गेस्ट हाउसेस आहेत. होम स्टेदेखील उपलब्ध आहेत. 

bhandardara

निघोजचा भौगोलिक चमत्कार : रांजणखळगे 
अमेरिकेतल्या ऍरिझोना राज्यात निसर्गानं एक चमत्कार घडवलाय. या भौगोलिक चमत्काराला नाव देण्यात आलंय ग्रॅंड कॅनियन. ऍरिझोना राज्यातील कोलोरॅडो नदीच्या प्रवाहानं सुमारे 50 ते 60 लाख वर्षांपूर्वी हा नैसर्गिक आविष्कार घडवलाय. नदीचा वेगवान प्रवाह इथल्या खडकांना कापत पुढं जातो. प्रवाहाबरोबर दगड-गोटे आणि इतरही वस्तू वाहत असतात. या खडकांशी लाखो वर्षं सातत्यानं घर्षण होत राहिल्यानं हा कॅनियन किंवा दरी निर्माण झाली. ही दरी तब्बल 446 किलोमीटर लांब आणि 29 किलोमीटर रुंद आहे. अशाच भौगोलिक चमत्काराचा छोटा आविष्कार, निघोज (जि. नगर) इथंही पाहायला मिळतो. या ठिकाणी ज्वालामुखीपासून तयार झालेला कॉम्पॅक्‍ट बेसॉल्ट आणि व्हेसिक्‍युलर बेसॉल्टचा एका आड एक थर आहे व त्यातून कुकडी नदीचा प्रवाह वाहतो. या खडकांमध्ये सुमारे 200 मीटर लांब आणि काही ठिकाणी 60 मीटर रुंद दरी तयार झाली आहे. याच दरीत नदीनं कोरून काढलेली चित्तवेधक पाषाणशिल्पं दिसतात. अनेक ठिकाणी खडकांना रांजणासारखा आकार प्राप्त झाल्यानं त्याला सामान्यपणे रांजणखळगे असं म्हटलं जातं. प्रवाहातून वाहत आलेले लहान-मोठे दगड नदीपात्रात तयार होणाऱ्या भोवऱ्यांमुळे गोल फिरत राहतात. त्यामुळं वर्तुळाकृती खड्डे तयार होतात. हेच आहेत रांजणखळगे. लाखो वर्षांपासून ही क्रिया घडत असल्यानं, पात्रातील खडकांना खळग्यांचं स्वरूप प्राप्त झालंय. शास्त्रीय दृष्टिकोनातून त्याला पॉट होल्स म्हणतात. या रांजणखळग्यांची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्येही झाली आहे. त्यामुळे जगभरातील शास्त्रज्ञ आणि पर्यटक या ठिकाणाला भेट देतात. 

कसे जाल? : पुण्यापासून निघोज सुमारे 112 किलोमीटर. पुणे-नगर रस्त्यावर शिरूर गावानंतर काही अंतरावर निघोजचा फाटा आहे. शिक्रापूरहूनही एक फाटा निघोजला जातो. निघोजमध्ये भोजन आणि निवासाची सोय आहे. 

 ranjankhalge

कासवांचं गाव - वेळास
रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेला वेळास नावाचं एक टुमदार कोकणी गाव आहे. विविध कारणांमुळं हे गाव प्रसिद्ध आहे. मराठेशाहीच्या अखेरच्या पर्वात शर्थीनं पेशवाई राखण्याचा प्रयत्न करणाऱ्या नाना फडणवीसांचं हे मूळ गाव. वेळासपासून जवळच ऐतिहासिक बाणकोटची खाडी आणि किल्ला आहे. गेल्या काही दशकांत वेळासचा समुद्रकिनारा अधिक प्रसिद्धीस आला आहे, तो ऑलिव्ह रिडली टर्टल्समुळं. वेळासचे नागरिक आणि चिपळूणच्या सह्याद्री निसर्ग मित्र या संस्थेमुळं आयुष्यभर समुद्रात राहणाऱ्या आणि विणीसाठी वेळासच्या समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या कासवांना आणि त्यांच्या पिलांना अभय मिळालं आहे. 

कसे जाल? : पुण्याहून तीन मार्गांनी वेळासला जाता येतं. पहिला मार्ग पुणे-मुंबई रस्त्यानं खोपोली-पेण-वडखळ मार्गे, ताम्हिणी घाटमार्गे आणि भोर-वरंध घाट मार्गे जाता येतं. ताम्हिणी मार्गे अंतर सुमारे १९४ किलोमीटर. मुंबईहून २२५, दापोलीहून सुमारे ४५ आणि श्रीवर्धनहून २१ किलोमीटर आहे. वेळास आणि बाणकोट या दोन्ही गावांत अनेक रिसॉर्ट आणि होम स्टे आहेत.

velas

आंबा घाटातील निसर्गाची उधळण 
धकाधकीच्या शहरी वातावरणातून काही काळ सुटका व्हावी, म्हणून वीकएंडला किंवा जोडून आलेल्या सुट्यांच्या दिवशी शांत, प्रदूषणविरहित आणि कसलाही गडबड-गोंधळ नसलेल्या भागात पडी टाकायला जातात. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अशी अनेक ठिकाणं आहेत. महाराष्ट्राच्या पश्‍चिम भाग आणि कोकणाला सह्याद्रीच्या रांगांनी विभागलंय. पावसाळ्यात हा संपूर्ण प्रदेश हिरवाईनं नटलेला असतो. पाहावं तिथं धबधब्यांचं साम्राज्य. दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, वाऱ्याच्या झुळकीवर झुलणारं हिरवंगार गवत आणि विविध रानफुलं लक्ष वेधून घेतात. याच सह्याद्रीच्या कुशीत वसलाय आंबा घाट. कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या अगदी सीमेवर. पश्‍चिम घाटातलं जैववैविध्य इथंही ठायी-ठायी दिसतं. पावसाळ्यात आंबा घाटाचं सौंदर्य तर खुलतंच, पण उन्हाळ्यातही थंड हवेचं ठिकाण म्हणून पर्यटक इथं गर्दी करतात. ब्रिटिश राजवटीत कोल्हापूरहून कोकणात उतरण्यासाठी या परिसरातून रस्ता नव्हता. आंबा गावच्या एका गुराख्यानं तो ब्रिटिश अभियंत्याला दाखवला. कालांतरानं हा घाटरस्ता झाला. त्यानंतर त्याचं नाव पडलं आंबा घाट. 

कसे जाल? - पुण्याहून कोल्हापूर रस्त्यानं सातारा, कराड, पाचवड फाट्यावरून उजवीकडं वळून मलकापूर आणि आंब्यापर्यंतचं अंतर सुमारे 240 किलोमीटर. मुंबईहून पुणे-सातारा-कराड-मलकापूरमार्गे किंवा मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल-इंदापूर-माणगावमार्गे सुमारे 285 किलोमीटर. आंबा गावात अनेक चांगले रिसॉर्ट आहेत. तिथं निवास आणि भोजनाची उत्तम सोय होऊ शकते. स्वतःचं वाहन असल्यास स्थानिक गाइडच्या मदतीनं संपूर्ण परिसर फिरून पाहता येईल. गावातूनही वाहनं किंवा रिक्षा उपलब्ध होऊ शकतात. 

Image result for amba ghat

अजिंक्‍य मुरूड, जंजिरा किल्ला
महाराष्ट्राला सुमारे ७५० किलोमीटर लांबीचा प्रदीर्घ आणि समृद्ध सागरी किनारा लाभला आहे. पालघर जिल्ह्यातील झाई-बोरगाव या गावापासून सुरू होणारा सागरी किनारा, दक्षिणेतील सिंधुदुर्गातील तेरेखोल किल्ल्यापर्यंत पसरलेला आहे. या किनाऱ्यावर अनेक प्रेक्षणीय स्थळे, किल्ले आणि जलदुर्गांची रेलचेल दिसून येते. मुंबईच्या कुशीत वसलेल्या रायगड जिल्ह्यामध्ये काही जलदुर्ग आहेत. त्यांपैकीच एक आहे दंडा-राजपुरीजवळील अभेद्य जंजिरा किल्ला. जंजिऱ्याचा अर्थच आहे समुद्रानं वेढलेला किल्ला. अरबी भाषेत त्याला जझिरा म्हणत असत. त्याचा अर्थ बेट. राजापुरी खाडीच्या मुखावर अगदी मोक्‍याच्या जागी हा अजेय जलदुर्ग उभा आहे. राजपुरीच्या पश्‍चिमेकडील समुद्रात एका विस्तीर्ण बेटावर हा किल्ला आहे. किल्ल्याच्या तटावरील ५७२ तोफांमुळं जंजिरा अभेद्य ठरला होता. या तोफांमध्ये ४० फूट लांबीची एक जंगी आणि लांब पल्ल्याची तोफ आहे आणि तिचं नाव आहे कलालबांगडी. त्याशिवाय चावडी आणि लांडा कासम नावाच्या आणखी दोन जबरदस्त तोफा होत्या. हबशी, म्हणजे आफ्रिकेतल्या ॲबिसिनिया देशातील निग्रो वंशियांनी इथं राज्य केल्यामुळं हा संपूर्ण परिसर त्या काळात हबसाण म्हणून प्रसिद्ध होता.

कसे जाल? पुण्याहून ताम्हिणी घाटमार्गे सुमारे १६६ किलोमीटर. मुंबईहून सुमारे १६० किलोमीटर आहे. मुरुडमध्ये निवास आणि भोजनासाठी अनेक हॉटेल आणि उपाहारगृहे आहेत.

janjira

मिनी महाबळेश्‍वर - माथेरान
यंदाच्या उन्हाळ्यानं कहर केलाय. सूर्यदेव नक्कीच कोपलेला दिसतोय. उन्हाच्या लाटांच्या तीव्रतेमुळं अंगाची काहिली होऊ लागलीय. जिवाची ही तगमग घालविण्यासाठी अनेकांनी हिमालयात जाण्याची तयारी सुरू केली असेल. आपल्याकडं वीकएंड पर्यटनासाठी एक पर्याय आहे; तो म्हणजे माथेरान. पश्‍चिम महाराष्ट्रातील महाबळेश्‍वरखालोखाल प्रसिद्ध असलेलं ठिकाण. जवळजवळ प्रदूषणविरहित माथेरान पर्यटकांचं आवडतं ठिकाण आहे. या पर्यटनस्थळाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथली टॉय ट्रेन. मध्यंतरी काही वर्षं तांत्रिक अडचणींमुळं बंद असलेली ही झुकझुक गाडी डिसेंबर २०१८ पासून पुन्हा सुरू झाली आहे. मुलांसाठी हे एक वेगळं आकर्षण आहे.

कसे जाल? - पुण्याहून वाहनानं कर्जतमार्गे सुमारे १३५ किलोमीटर. मुंबईहून ११५ किलोमीटर. पुणे आणि मुंबईहून ट्रेननंही जाता येतं. ट्रेननं गेल्यास कर्जतला उतरावं लागतं. नेरळहून ट्रेक करूनही जाता येतं. हे अंतर आहे ११ किलोमीटर. नेरळ-माथेरान टॉय ट्रेन किंवा टॅक्‍सी उपलब्ध आहे.
भोजन आणि निवासाची इथं उत्तम सोय होऊ शकते. एमटीडीसीचं रिसॉर्ट, अनेक हॉटेल आहेतच; पण घरगुती राहण्याची सोयदेखील आहे. निवासासाठी ऑनलाइन बुकिंग करून गेल्यास खोळंबा होणार नाही.

matheran

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Best weekend getaways near Maharashtra