सरकारी विद्यापीठांपेक्षा खासगी संस्थांत चांगली सेवा

सरकारी विद्यापीठांपेक्षा खासगी संस्थांत चांगली सेवा

मुंबई - संस्था चालविणे हे सरकारचे काम असू शकत नाही. जिथे सरकारचा कमीत कमी हस्तक्षेप असतो, तिथे यश मिळते, असा अनुभव आहे. सरकारी शाळा, विद्यापीठांपेक्षा खासगी संस्थामध्ये काकणभर अधिक चांगली सेवा मिळते, हे वास्तव आहे. पद्मश्री डी. वाय. पाटील यांनी खासगी संस्था चालवितानाही सामाजिक संवेदना जपता येतात, याचे आदर्श उदाहरण निर्माण केले असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी काढले. 

डी. वाय. पाटील यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त आज आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात गडकरी बोलत होते. या वेळी व्यासपीठावर माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित होते. 

गडकरी म्हणाले की, वसंतदादा पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात खासगी संस्थांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला तेव्हा टीका करण्यात आली. पण डी. वाय. पाटील यांच्यासारख्या दूरदर्शी संस्थाचालकांनी हा आरोप खोटा ठरविला आहे. त्यामुळे आता वैद्यकीय महाविद्यालयेसुद्धा खासगी कंपन्यांप्रमाणे चालविण्याचा सरकारचा मानस आहे. 

शरद पवार यांनी भाषणात डी. वाय. पाटील आणि ते १९६७ मध्ये एकत्रच विधानसभेवर निवडून आल्याची आठवण सांगितली. दहा वर्षांच्या आमदारकीनंतर त्यांनी शिक्षण क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. राजकारणात कुठे थांबावे हे त्यांना कळले, असे ते म्हणाले. सत्काराला उत्तर देताना डी. वाय. पाटील यांनी त्यांच्या वाटचालीत सहकार्य केलेल्या प्रत्येकाचा विशेष उल्लेख करून आभार मानले. 

बिहार हे राजकारणात आकंठ बुडालेले राज्य आहे. तिथे राज्यपाल म्हणून मानाने निवृत्त होण्याचा पराक्रम कदाचित एकट्या डी. वाय. पाटील यांनीच केला. 
- सुबोधकुमार सहाय, माजी केंद्रीय मंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com