मतदानाच्या शाईचा "धसका' 

मतदानाच्या शाईचा "धसका' 

ठाणे : मतदानाचा हक्क बजावल्याची खूण म्हणून मतदान करण्यापूर्वी मतदाराच्या हाताच्या बोटाला शाई लावली जाते; मात्र या शाईचा धसका मतदान कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेवेळेस वापरण्यात आलेल्या शाईमुळे अनेक निवडणूक कर्मचाऱ्यांच्या हाताला इजा झाली होती. शाईच्या या ऍलर्जीमुळे कर्मचाऱ्यांची बोटे सुजण्यासह हाताची त्वचादेखील जळून गेल्याचा प्रकार घडला होता.

आता विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 21 तारखेला मतदान होत असल्याने पुन्हा त्याच बाटलीतील "म्हैसूर शाई' वापरली जाणार असल्याने निवडणूक कर्मचारी धास्तावले आहेत. तेव्हा, भारत निवडणूक आयोगाने योग्य ती दक्षता घ्यावी, अशी मागणी कर्मचारी करीत आहेत. 

राज्यात विधानसभा निवडणुकांचा प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक असून मतदान प्रक्रिया सुरळीत व सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी निवडणूक विभाग सज्ज झाला आहे. त्यानुसार मतदान प्रक्रियेसाठी लागणारा सर्व जामानिमा प्रशासनाने तयार ठेवला आहे. यात मतदान केल्याचा पुरावा म्हणून मतदाराच्या हाताच्या बोटाला लावल्या जाणाऱ्या काळ्या रंगाच्या शाईच्या हजारो बाटल्यांचादेखील समावेश आहे. मतदान केंद्रात मतदान करणाऱ्या प्रत्येकाच्या बोटाला शाई लावण्याच्या कामासाठी एका कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते; मात्र निवडणूक आयोगाने पुरवलेली ही शाई घातक ठरत असल्याचे समोर आले होते. 

लोकसभा निवडणुकीमध्ये घोडबंदर रोडवरील दीपा ठाणेकर आणि मुलुंड येथील राजश्री विरणक या दोन्ही निवडणूक अधिकाऱ्यांच्या हाताची बोटे शाईमुळे सुजून त्वचा भाजली होती. पेशाने प्राध्यापक असलेल्या ठाणेकर यांची नियुक्ती मुंबईतील मतदान केंद्रात; तर ठाणे महापालिकेच्या अधिकारी असलेल्या विरणक यांची नियुक्ती ठाणे लोकसभेतील ओवळा-माजिवडा मतदान केंद्रात होती. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर तिसऱ्या दिवसानंतर शाईचे दुष्परिणाम जाणवल्याचे त्यांनी सांगितले होते. यासंदर्भात ठाणे जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांना वारंवार संपर्क साधूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. 

निवडणूक साहित्याचा दर्जा सुमार? 

मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगाकडून पुरवले जाणारे साहित्य गुणवत्ताहीन असते, अशा तक्रारी निवडणूक कर्मचारी करीत असतात. याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीदरम्यान आला होता. हातात न मावणारा छोटा स्टॅपलर, चिमुकल्या ब्रशसोबत निमुळत्या तोंडाची छोटी शाईची बाटली जेणेकरून बाटलीतून शाई काढून लावताना हात बरबटण्याची शक्‍यता अधिक. मतदान केंद्रात शाई सांडल्यास साध्या टीपकागदाचीदेखील सोय नसते. तेव्हा बोटाला खूण करण्यासाठी मार्कर पेन अथवा कर्मचाऱ्यांना हॅण्ड ग्लोव्हज पुरवावेत, अशी मागणी कर्मचारी करीत आहेत. 

मतदानासाठी म्हैसूरची शाई 

भारत निवडणूक आयोगामार्फत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे कामकाज हाताळले जात असून दोन्ही निवडणुकीत शाईची बाटली वापरली जाते. ही शाई म्हैसूर येथील म्हैसूर पेंटस्‌ ऍण्ड वॉर्निश लि. कंपनीमध्ये तयार केली जाते. ही कंपनी कर्नाटक सरकारच्या अंतर्गत येते. भारतासह जगातील अनेक देशांना निवडणुकीसाठी शाई याच कंपनीमार्फत पुरवण्यात येते. म्हणूनच या शाईला "म्हैसूरची शाई' म्हणून ओळखले जाते. सर्वप्रथम 1962 मध्ये झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शाईचा वापर करण्यात आला. या शाईमध्ये सिल्व्हर नायट्रेट आणि अल्कोहोल यांचे मिश्रण असल्याचे माहितगारांनी सांगितले. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com