भगतसिंह कोश्यारींना राज्यपालपदावरुन हटवण्याची चिन्हं

tep.jpg
tep.jpg

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात केंद्रस्थानी राहिलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. राजस्थानच्या राज्यपालपदाची धुरा सांभाळणाऱ्या कलराज मिश्र यांची महाराष्ट्रात वर्णी लागण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून  महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते मनिष तिवारी यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. पहाटेच्या सुमारास राष्ट्रपती राजवट हटवून देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे राज्यपाल टीकेचे धनी झाले होते. त्यामुळे कोश्यारी यांची दुसऱ्या राज्यात उचलबांगडी होण्याची शक्यता वर्तवली जाते. 

तर दुसरीकडे राजस्थानच्या राज्यपालपदी असलेल्या कलराज मिश्र यांना महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून आणण्याची अटकळ बांधली जात आहे. राज्यातली सत्ता हातातून गेल्यानंतर भाजपानं प्रतिमा संवर्धनासाठी हा खटाटोप चालवल्याचीही चर्चा आहे. मोदी सरकार लवकरच राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरून हटवणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.  

कोण आहेत कलराज मिश्र?-कलराज मिश्र हे उत्तर प्रदेशमधील भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. मिश्र हे लखनौमधून आमदार, तसंच राज्यसभेवर खासदारही होते. त्यांनी राज्यात आणि केंद्रात मंत्रिपदही सांभाळलं आहे. तसंच उत्तर प्रदेशातील भाजपचं प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत होते.

कलराज मिश्र यांनी 9 सप्टेंबरला राजस्थानच्या राज्यपालपदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्याआधी हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून ते 22 जुलैला नियुक्त झाले होते.

भगत सिंग कोश्यारी कोण?-भगत सिंग कोश्यारी यांचा जन्म 17 जून 1942 रोजी झाला. कोश्यारी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत असून भाजपच्या वरिष्ठ फळीतील नेते आहेत. आणीबाणीच्या काळात 1977 मध्ये त्यांनी तुरुंगवारीही भोगली आहे.

उत्तराखंड राज्याच्या निर्मितीनंतर भगत सिंग कोश्यारी यांच्याकडे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. 2001-2002 या काळात ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. 2002 ते 2007 या काळात उत्तराखंड विधानसभेच्या विरोधीपक्ष नेतेपदी त्यांची वर्णी लागली होती. 2008 ते 2014 या काळात ते राज्यसभेचे खासदार होते. 77 वर्षीय भगत सिंग कोश्यारी यांनी इंग्रजी साहित्य विषयात पदवी संपादन केली आहे. व्यवसायाने ते शिक्षक आणि पत्रकारही होते.

राज्यपालांकडे कोणती जबाबदारी?भारतीय राज्यपाल हे एक संवैधानिक पद असून त्याला संवैधानिक महत्त्व आहे. राज्याचा संकटकालीन निधी हा राज्यापालांच्या हाती असतो. राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतींद्वारे होते. राष्ट्रपतींचा प्रतिनिधी म्हणून संबंधित घटकराज्याचं काम राज्यपाल पाहतो.

राज्यपालाच्या नेमणुकीसाठी पुढील पात्रता आवश्यक

1. ती व्यक्ती भारतीय नागरिक असावी
2. त्या व्यक्तीने वयाची 35 वर्षे पूर्ण केलेली असावीत

राज्यपालांचा कार्यकाळ-सर्वसाधारणपणे राज्यपालांचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो. मुदतीपूर्वी तो राजीनामा देऊ शकतो. पाच वर्षांची मुदत संपल्यावर त्याची त्याच पदावर पुन्हा नियुक्ती राष्ट्रपती करु शकतात.

राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा अधिकार- देशातील कोणत्याही राज्यात शासकीय कारभार संविधानानुसार चालणे शक्य नसल्याचा अहवाल संबंधित राज्याच्या राज्यपालांनी राष्ट्रपतींना दिला किंवा तसा अहवाल नसतानाही राष्ट्रपतींची स्वत:ची तशी खात्री पटली, तर राष्ट्रपती त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करु शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com