Bhagat Singh Koshyari : वाह रे भाजप! सगळं करुन घेतल्यानंतर राज्यपालांचं पदमुक्ततेसाठी पत्र? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhagat Singh Koshyari pm modi desire to step down bjp maharashtra politics

Bhagat Singh Koshyari : वाह रे भाजप! सगळं करुन घेतल्यानंतर राज्यपालांचं पदमुक्ततेसाठी पत्र?

भगतसिंह कोश्यारी... महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त राज्यपाल... महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या महापुरुषांवर आक्षेपार्ह विधानं करुन कायम वादात राहिलेत.

त्यामुळेच मागील काही महिन्यांपासून भाजपा वगळता जवळपास राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी कोश्यारींची राज्यपाल पदावरुन उचलबांगडी करण्याची मागणी केली होती.

पण, आज एक मोठी अपडेट घडली ती म्हणजे खुद्द कोश्यारींनीच पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आपल्याला महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरुन मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आता राज्यपालांनी पत्र लिहिण्यासाठीच हीच वेळ का निवडली? यामागे काय राजकारण आहे? असा प्रश्न पुढे येत आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी... हे नाव आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासातील कुठल्याही राज्यपाल पदावरील व्यक्तीपेक्षा जास्तच माध्यमांमध्ये आणि राजकीय वर्तुळात चर्चेत राहिलं. कारण राज्यपाल पदावर बसलेल्या या व्यक्तीनं पदाला शोभेल असा कमी अन् भाजपाचा पदाधिकारी म्हणूनच कार्यभार केलेला जास्त दिसतो.

हेही वाचा: Balasaheb Thackeray : बाळासाहेब हिंदू धार्जिणे होते, हे अर्धसत्य; अजित पवारांचे विधान

१. २०१९ साली जिथे शिवसेना-भाजपा युतीचं बिनसलं, अन् राज्यात राष्ट्रपती राजवटीचं चित्र होतं. तिथे याच राज्यपालांनी पहाटेचा अजितदादा आणि फडणवीसांचा अभूतपूर्व असा शपथविधी घडवून आणला. त्यानंतर अवघ्या २-अडीच दिवसात अजितदादांचं बंड पवारांनी कसं हाणून पाडलं आणि ते सरकार पडलं हे महाराष्ट्रानंच नाही तर देशानं पाहिलं.

२. राज्यपालनियुक्त विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या यादीवर कोश्यारींनी स्वाक्षरी केली नाही. म्हणजे महाविकासआघाडीचं सरकार पडलं पण सरकारनं सूचित केलेल्या आमदारांच्या पत्रावर कोश्यारींनी स्वाक्षरी केली नाही. म्हणजे मविआच्या नेत्यांचं शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटी घेऊन वैतागलं पण राज्यपाल मात्र तत्कालीन सरकारला हवं तसं काम करत नव्हते. राज्यपाल कोश्यारींचं आणि ठाकरे सरकारचं कधीच पटलं नाही.

हेही वाचा: Ajit Pawar : 'त्यांना डायपर घातले पाहिजे...'; हिंदू जन आक्रोश मोर्चातून थेट पवारांवर अर्वाच्च भाषेत हल्ला

३. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना विधानसभा किंवा विधानपरिषदेचं सदस्य होणं बंधनकारक होतं. मात्र, राज्यपालांनी त्यांची विधानपरिषदेवरील नियुक्ती रखडून ठेवली होती.

४. जनतेमधून थेट सरपंच निवडण्याचा निर्णय रद्द केल्यानंतर पूर्वीप्रमाणेच सरपंच निवडण्यासाठी अध्यादेश काढावा, ही ठाकरे सरकारने केलेली शिफारसही राज्यपाल कोश्यारींनी फेटाळली.

५. २०२१ सालच्या फेब्रुवारी महिन्यात तर सरकारी विमान द्यायला मुख्यमंत्री कार्यालयानं परवानगी नाकारली आणि मग मुख्यमंत्र्यांना विमानातून उतरुन राजभवनात परतावं लागलं.

६. लॉकडाऊन काळात मंदिरं बंद ठेवण्यावरुन त्यांनी ठाकरेंना पत्र लिहून हिंदुत्वाची आठवण करुन दिली.

त्यामुळे मविआ सरकारच्या काळात कायम सरकारविरोधी भूमिका घेऊन चर्चेत आणि वादात आलेले राज्यपाल संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिले.

तर, आता भाजपा-शिंदे गटाचं सरकार आल्यानंतरही कोश्यारींनी आपल्या वाचाळवीरतेमुळे जणूकाही पक्षालाच अडचणीत आणलं. महापुरुषांच्या अवमानप्रकरणी तर खुद्द मुख्यमंत्रीपदावर असणाऱ्या शिंदे गटातील आमदारांनीही कोश्यारींना राज्यपाल पदावरुन हटवण्याची मागणी केली.

हेही वाचा: Uddhav Thackeray : 'हिंदूत्व हे थोतांड आहे'; उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर निशाणा

छत्रपती शिवरायांचा अपमान केल्यानंतर छत्रपती घराण्याचे वंशज आणि भाजपातील खासदार उदयनराजे, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही कोश्यारींच्या विधानाचा समाचार घेतला. अगदी राज्यातून हाकलून देण्याची मागणी केली.

पण, एवढं सगळं होऊनही महाराष्ट्र भाजपा आणि केंद्रीय नेतृत्वानं मात्र कोश्यारींवर मौन बाळगणंच पसंत केलं. पण, आज राज्यपाल कोश्यारींनी थेट मोदींना पत्र लिहून पदमुक्त होण्याची मागणी केल्यानं राजकीय वर्तुळात पुन्हा कोश्यारी चर्चेत आले.

पण यावेळी विरोधकांनी आजचा दिवस हा बाळासाहेबांचा दिवस आहे, आणि यादिवशी आम्ही इतरांना महत्व देऊ इच्छित नाही अशी भूमिका घेतली. तर, सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटानंही याला म्हणावं इतकं महत्व दिलेलं नाही.

आता कोश्यारींची पत्र लिहिण्याची वेळ का महत्वाची?

नुकताच पंतप्रधान मोदींनी मुंबईचा दौरा केला. विविध विकासकामं आणि मुंबई मेट्रो ७ आणि २ अचं लोकार्पण केलं. येत्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बीकेसीतील सभेतून रणशिंगही फुंकलं.

मोदींनी आपल्या भाषणातून थेट ठाकरेंचं नाव घेतलं नसलं तरी भ्रष्टाचारावरुन आरोप केले. शिवाय मुंबईच्या विकासासाठी केंद्रात, राज्यात आणि मुंबई महापालिकेत भाजपाचीच सत्ता हवी असंही बोलून दाखवलं.

त्यामुळे एकीकडे मोदी पक्षासाठी चांगली मोट बांधून मुंबईकरांना आपल्या भाषणात गुंतवून गेले असताना तिकडे कोश्यारींच्या वादग्रस्त विधानांमुळे आपण अडचणीत येऊ शकतो, याची जाणीव महाराष्ट्र भाजपाला झाली असेल. त्यामुळे पक्षानंच त्यांना पदमुक्त करण्यासाठी हालचाली केल्याचं बोललं जातंय. आणि त्यातूनच कोश्यारींनी मोदींना पदमुक्त करण्याचं पत्र लिहून आवाहन केल्याचं कळतंय आणि त्या पत्रातलं कारणही इंटरेस्टिंग आहे बरं का... तर कोश्यारींनी म्हटलंय.

आपण आपला उर्वरित वेळ अध्ययन, मनन, चिंतन याकामी सार्थकी लावणार आहोत. त्यामुळे आता आपल्याला पदमुक्त करावं अशा मागणीचं पत्र राज्यपाल कोश्यारींनी नुकत्याच मुंबई दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान मोदींकडे दिल्याची माहिती आहे.

हेही वाचा: Bhagat Singh Koshyari : मोदी सरकारला महाराष्ट्राचा इतका आकस का? कोश्यारींच्या राजीनाम्यावरून काँग्रेसची टीका

त्यामुळे लवकरच भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी नसतील पण त्यांच्या जागी आता कुणाची वर्णी लागेल हे आता सांगणं तरी कठीण आहे. पण कोश्यारींनी मोदींना पदमुक्त करण्याविषयी लिहिलेल्या पत्राची मोदी कितपत दखल घेतात आणि त्यामुळे राज्यातलं राजकारण कसं बदलतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तरी, आपल्याला याविषयी काय वाटतं हे कमेंट करुन नक्की सांगा आणि ताज्या बातम्यांसाठी सकाळचं युट्युब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.