
Bhagat Singh Koshyari : कोश्यारी राजभवनात परतले! सत्तेच्या गदारोळात नव्या राज्यपालांना मार्गदर्शन?
मुंबईः महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या इतिहासात सर्वात चर्चिले गेलेले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे मुंबई दौऱ्यावर येत आहेत. राजभवनामध्ये त्यांचा तब्बल सहा दिवस मुक्काम आहे. त्यामुळे या सहा दिवसांमध्ये ते नेमकं काय धडे गिरवणार आहेत, यासंबंधीच्या चर्चा रंगल्या आहे.
राज्यातल्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर संभ्रम निर्माण झाला आहे. शिंदेंच्या शिवसेनेचा प्रतोद बेकायदेशीर असल्याचं कोर्टाने नमूद केलं खरं परंतु उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने शिंदेंची सत्ता कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलं.
आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदारांची बैठक घेत आहेत. त्यातच भगतसिंग कोश्यारी जे आजपासून २१ तारखेपर्यंत मुबंई दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांचा राजभवनात मुक्काम असणार आहे. १७ मे २० मे दरम्यान त्यांचे नियोजित कार्यक्रम असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालामध्ये राज्यपालांनी एकनाथ शिंदेंना सत्तास्थापनेचं दिलेलं निमंत्रण घटनाबाह्य असल्याचं नमूद केलं होतं. विरोधकांच्या हालचाली, सत्ताधाऱ्यांची अस्थिरता या अनुषंगाने कोश्यारींचा दौरा चर्चिला जात आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर कोश्यारी राजभवनात सहा दिवस मुक्काम करणार असल्याने नेमकी खेळी काय? राज्यपाल काही धडे देणार आहेत का? यासंबंधी चर्चांना उत आला आहे.