भाविकांच्या पैशावर सरकारचा घाला - अशोक चव्हाण

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 3 डिसेंबर 2018

मुंबई - राज्य सरकारचे आर्थिक व्यवस्थापन पूर्णपणे बिघडले असून, भाजप-शिवसेना सरकारच्या काळात महाराष्ट्र राज्य कर्जबाजारी झाले आहे, हे आता स्पष्ट दिसते आहे. नगर जिल्ह्यातील निळवंडे सिंचन प्रकल्पासाठी शिर्डी संस्थानला भाविकांनी देणगी म्हणून दिलेल्या पैशावर राज्य सरकारने घाला घातला आहे. त्यामुळे "कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?' हा प्रश्न जनतेने सरकारला विचारण्याची वेळ आली आहे, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.

या संदर्भात बोलताना चव्हाण म्हणाले, की राज्यातील प्रकल्प हे करदात्यांच्या पैशातून होत असतात. पण सरकारला आर्थिक नियोजन नसल्याने केवळ 4 वर्षांत या भाजप-शिवसेना सरकारने राज्यावर पाच लाख कोटींपेक्षा जास्त कर्जाचा बोजा करून ठेवला आहे. पुरवणी मागण्यांचा तर जागतिक विक्रम या सरकारने केला आहे.

महालेखापालांनीही या सरकारच्या आर्थिक गैरव्यवस्थापनावर ताशेरे ओढले आहेत. राज्य सरकार पेट्रोल, डिझेलवर दुष्काळी, तसेच हायवेवरील दारूची दुकाने बंद केली म्हणून सेस लावून जनतेचे कंबरडे मोडत आहे. सत्तेवर आल्यावर मोठमोठ्या वल्गना करून श्‍वेतपत्रिका काढणाऱ्या सरकारचे पितळ आता उघडे पडले आहे.

सिंचनाकरिता मागील सरकारने दिलेल्या सुधारित प्रशासकीय मान्यतांवर बोट ठेवणाऱ्या भाजपच्या सरकारने गेल्या तीन वर्षांत 64 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्तीच्या सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्या आहेत. "जलयुक्त शिवार'मधील गैरव्यवहारदेखील पुढे आले आहेत. याचबरोबर वित्त आयोगाने महाराष्ट्रात सिंचन क्षमतेत काडीमात्र वाढ झाली नाही, असे सांगत या सरकारला आरसा दाखवला आहे.

त्यासोबतच भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने दिलेल्या अहवालात महाराष्ट्रात जवळपास 31 हजार गावांत भूजल पातळीत मोठी घट झाली आहे, हे स्पष्ट झाल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Web Title: Bhavik Money Government Ashok Chavan