महाराष्ट्रभर बंदचे पडसाद; तोडफोड, जाळपोळीच्या घटना

बुधवार, 3 जानेवारी 2018

नागपूरपासून कोल्हापूरपर्यंत बंदचे पडसाद उमटत असून, अनेक ठिकाणी रास्ता रोको व विविध मार्गाने आंदोलन करण्यात येत आहे. डाव्या आणि दलित संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला मराठा संघटनांनीही प्रतिसाद दिला आहे.

मुंबई : सणसवाडी हिंसाचार हाताळण्यास गृह विभागाने कसूर केली असून, पोलिसांनी या प्रकरणात अक्षम्य हेळसांड केल्याचा आरोप करत भारतीय बहुजन महासंघाने आज (बुधवार) पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला राज्यभरात प्रतिसाद मिळत आहे. नागपूरपासून कोल्हापूरपर्यंत बंदचे पडसाद उमटत असून, अनेक ठिकाणी रास्ता रोको, दगडफेक व जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. डाव्या आणि दलित संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला मराठा संघटनांनीही प्रतिसाद दिला आहे.

राज्यातील परिस्थिती :

 • पुणे: मिलिंद एकबोटे, गिरीश बापट यांच्या घरासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
 • पुणे: पीएमपीची वाहतूक विस्कळीत, अनेक मार्गांवरील वाहतूक बंद. प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय.
 • कोल्हापुरात जमाव भडकला, बिंदू चौकात जमावावर पोलिसांचा लाठीमार
 • मुंबई : गोंवडी, मानखुर्द, मुलुंड, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, कांदीवली पूर्व, मालाड पूर्व, दहिसर पूर्वच्या शाळा बंद ठेवण्यात आल्या 
 • सोलापूर: माकपचे माजी आमदार आडम मास्तर आणि 30 कार्यकर्ते ताब्यात, कोरेगाव भीमाच्या निषेधार्थ विनापरवाना मोर्चा काढण्याचा प्रयत्न 
 • पिंपरी चिंचवडमध्ये बंद शांततेत, दुकाने बंद, वाहतूक सुरु, वर्दळ मंदावली, काही शाळा कॉलेजही सुरु, वातावरणात तणाव
 • डोंबिवली (मुंबई)- डोंबिवली रेल्वे स्थानकात आंदोलकांचा रेल रोको. सिमेंटच्या गोण्या टाकून अडवला ट्रॅक
 • चंद्रपूर जिल्ह्यात कडकडीत बंद, ठिकठिकाणी रास्ता रोको, शाळा, महाविद्यालये, पेट्रोल पंप बंद 
 • मुंबईच्या पश्चिम उपनगरात बंदचा जोर, वांद्रे कलानगर जंक्शनवर मोठा जमाव जमल्याने पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतुक कोंडी 
 • सांगली: आंबेडकर पुतळ्याजवळ कडेकोट पोलिस बंदोबस्त, शहरातील शाळा, महाविद्यालये बंद, एसटी वाहतूक सकाळपासून बंद
 • कोल्हापूर: संभाजी नगर चौकात रास्ता रोको, वाहनांची तोडफोड, पोलिस बंदोबस्त कमी पडत आहे
 • नागपूर: शताब्दी चौकात टायर जाळून वाहतूक रोखून धरण्याचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न
 • नाशिक: शहरात जनजीवन सुरळीत सुरू, शालेय बस, व्हॅन, प्रवासी रिक्षा बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
 • शिरपूर (जि. धुऴे): बंदला हिंसक वळण, शिरपूर आगारात शिरलेल्या टोळक्याने दोन बसेस फोडल्या. एक संशयित ताब्यात
 • पालघरमध्ये कडकडित बंद, जिल्ह्यातील 10 संघटनांनी पुकारलेल्या बंदला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद, जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठा बंद 
 • मुंबई: चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर सकाळी ६ वाजता दगडफेक, बेस्टची वाहतूक सुरळीत सुरू
 • औरंगाबाद: शहरातील इंटरनेट सेवा बंद; एसटी महामंडळाची सेवा दुपारी १२ वाजेपर्यंत बंद, परिस्थितीनुसार पुढील निर्णय
 • कोल्हापूर: एसटी वाहतूक बंद असल्याने प्रवाशांचे हाल, महानगरपालिकेची परिवहन सेवाही बंद ठेवण्यात आल्याने चाकरमान्यांची गैरसोय 
 • पुण्यात स्कुल बसेस बंद, पीएमपीची सेवा सुरळीत सुरु, रस्त्यावर तुलनेने कमी गर्दी, दुकाने, बाजारपेठ अद्याप बंद 
 • मुंबई: जेवणाचे डबे पोचवण्याची सेवा बंद ठेवण्यात आल्याची मुंबई डबेवाला असोसिएशनची माहिती 
 • पालघरमध्ये कडकडित बंद, जिल्ह्यातील 10 संघटनांनी पुकारलेल्या बंदला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद, जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठा बंद 
 • नागपूर: 'महाराष्ट्र बंद' मुळे विद्यार्थी आणि वाहनांच्या सुरक्षिततेसाठी बहुतांश संस्थांकडून शाळा बंद
 • ठाणे: ४ जानेवारीपर्यंत जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश
 • रत्नागिरी: महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर गुहागर आगारात एसटी थांबवून ठेवल्या
 • अमरावती बसस्थानकांवरून यवतमाळ, वाशीम, अकोला जाणाऱ्या बस फेऱ्या रद्द, शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त
 • वणीत कडकडीत बंद, खाजगी शाळांना सुट्टी, सलग दुसऱ्या दिवशी वणीतील जनजीवन विस्कळीत, एसटी बसेससह खाजगी वाहनेही बंद, प्रवाशी व चाकरमान्यांची गैरसोय
Web Title: Bhima Koregaon Maharashtra Bandh violance in Bhima Koregaon