‘सरकार उलथवण्याचा संशयितांचा प्रयत्न’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

पुणे - प्रतिबंधित माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या तीन संशयितांना त्यांच्याच घरी पाच सप्टेंबरपर्यंत नजरकैदेत ठेवण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने संशयित माओवाद्यांना घरी नजरकैदेत ठेवण्याबाबत आदेश दिल्यानंतर जिल्हा न्यायाधीशांनी उपरोक्‍त आदेश दिला. 

पुणे - प्रतिबंधित माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या तीन संशयितांना त्यांच्याच घरी पाच सप्टेंबरपर्यंत नजरकैदेत ठेवण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने संशयित माओवाद्यांना घरी नजरकैदेत ठेवण्याबाबत आदेश दिल्यानंतर जिल्हा न्यायाधीशांनी उपरोक्‍त आदेश दिला. 

कोरेगाव भीमा येथील दंगल घडविल्याच्या आरोपाखाली पुणे पोलिसांच्या पथकाने देशभरात विविध ठिकाणी छापे टाकले. सुधा भारद्वाज (रा. हरियाणा), गौतम नवलखा (रा. नवी दिल्ली) यांच्यासह पी. वरावरा राव (वय 78, रा. तेलंगणा), वेरनोन स्टॅनिसलॉस गोन्सालवीस (वय 61, रा. अंधेरी पूर्व, मुंबई) आणि अरुण थॉमस परेरा (वय 50, रा. बांद्रा, मुंबई) या संशयितांना मंगळवारी पहाटे अटक केली होती. त्यापैकी राव, गोन्सालवीस आणि परेरा या तिघांना बुधवारी दुपारी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी न्यायालयात सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी युक्‍तिवाद केला. त्यानुसार, शनिवारवाडा येथे 31 डिसेंबर रोजी एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात कबीर कला मंचच्या सदस्यांनी चिथावणीखोर वक्‍तव्य केले. या संघटनेचे माओवादी संघटनेशी संबंध आहेत. त्यांच्या आदेशानुसारच एल्गार परिषदेचे आयोजन करून कोरेगाव भीमा येथे सरकारविरोधात द्वेषाची भावना निर्माण करण्यात आली. आरोपींच्या घरझडतीमध्ये जप्त केलेल्या दस्तवेज आणि इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंची तपासणी करणे, त्यांचे इतर सदस्यांशी आक्षेपार्ह संदेश, गोपनीय पत्रव्यवहाराबाबत तपास करावयाचा आहे. तसेच, सरकार उलथवून लावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवत आरोपींना 14 दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी ऍड. पवार यांनी केली. 

संशयित माओवाद्यांचे जम्मू-कश्‍मीर येथील प्रतिबंधित संघटनेशी संबंध आहेत. राव हे नेपाळ आणि मणिपूर येथून शस्त्र खरेदी करण्याच्या प्रयत्नात होते. तसेच, परेरा हे तरुणांना भडकावून नक्षली प्रशिक्षण देत असल्याचा युक्तिवाद पवार यांनी केला. 

आरोपींच्या वतीने ऍड. रोहन नहार आणि ऍड. राहुल देशमुख यांनी बाजू मांडली. एल्गार परिषदेचे आयोजन आणि कोरेगाव भीमा येथील दंगलीचा संबंध लावणे चुकीचे आहे. तसेच, संघटनेच्या सदस्यांनी एकमेकांशी संवाद साधणे, याचा अर्थ दहशतवादी कारवाया करणे असा होत नाही, असा युक्‍तिवाद त्यांनी केला. 

"सह्या कशावर घेतल्या महीत नाही' 
न्या. किशोर वडणे यांनी तिघा आरोपींना "तुम्हाला काही सांगायचे आहे का,' असे विचारले. तेव्हा राव यांनी, "माझे वय 78 वर्षे असून, औषधे सुरू आहेत. मला मराठी भाषा येत नसून, पोलिसांनी पंचनामा मराठीत लिहिला आहे. माझ्या सह्या कशावर घेतल्या हे माहीत नाही. पोलिस लॉकअपमध्ये अंधार असून, वृत्तपत्र वाचायला मिळत नाही,' अशी तक्रार केली. गोन्सालवीस यांनी, आपल्याला उच्च रक्‍तदाब असून, औषधे सुरू असल्याचे सांगितले. तर, परेरा यांनी, आपण तपासात सहकार्य करीत असून, पोलिस कोठडीची गरज नसल्याचा युक्‍तिवाद स्वत: केला. 

- संशयितांना दुपारी 2.52 वाजता न्यायालयात हजर 
- युक्‍तिवादास उशीर होत असल्याने 15 मिनिटांनी न्यायाधीश त्यांच्या कक्षात गेले 
त्यानंतर न्यायालयीन कामकाजास सुरवात 
- दोन्ही बाजूंच्या युक्‍तिवादानंतर या प्रकरणाशी संबंधित सर्वोच्च न्यायालयाचा आदेश 
- सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत मिळाल्यानंतर सायंकाळी सव्वासातला न्यायालयाचा आदेश 

Web Title: Bhima Koregaon riots The attempt of the suspects to overthrow the government