भीमाशंकर अभयारण्यातील पाणवठे आटले

भीमाशंकर अभयारण्यातील पाणवठे आटले

भोरगिरी - भीमाशंकर अभयारण्यात जंगली प्राण्यांसाठी असलेले बहुतांश पाणवठे कडक उन्हाने आटले असून, प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी स्थलांतर करावे लागत आहे.

खेड तालुक्‍यातील भीमाशंकर ते वांद्रे या दरम्यान सह्याद्रीच्या पर्वत रांगांचे दहा किलोमीटरचे अंतर आहे. या भागात करप, कारवी या झाडांबरोबर जंगली वनस्पतींची घनदाट झाडी आहे. 

पावसाळ्यात येथे सुमारे तीन हजार मिमी इतका पाऊस पडतो. मात्र खडकांच्या भौगोलिक रचनांमुळे पावसाळ्यात पाणी वाहून जाते, तर उन्हाळ्यात जमिनीत मुरते. दाट जंगल वस्तीमुळे या भागात शेकरू, भेकर, सांबर, रानडुक्कर, ससे तसेच माकडांची वस्ती आहे. 

या प्राण्यांसाठी वनविभागाने ठिकठिकाणी तळी खोदली आहेत. यंदा कमळजामाता तळे, पिप्रावणे तळे आणि कारवीचे तळे ही मे महिन्यातच आटली आहेत. या तळ्यात मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने पाण्याचे प्रमाणही कमी होते. 

प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. त्यांना भोरगिरी, खरपूड या भागात जाऊन पाणी शोधावे लागत आहे. या प्रकारामुळे त्यांच्या जिवाला धोका संभवतो. जंगलाच्या डोंगरमाथ्यावरील झाडेझुडपेही तीव्र उष्णतेने सुकली आहेत. या भागात अद्याप वळीवाचा पाऊस झालेला नाही.

‘पाणवठ्यांची संख्या वाढवा’ 
‘‘यंदा पाण्याची खूपच वाईट परिस्थिती आहे. येथील तळ्यातील गाळ काढून खोल व रुंद करण्याची गरज आहे. सध्या पाणवठ्यांच्या संख्येत वाढ करणे गरजेचे आहे. वनखात्याने तातडीने वेळवळी परिसरातील काही तळ्यात टॅंकरने पाणी सोडले, तर प्राणी येथेच थांबून राहतील व त्यांचे प्राण वाचतील. महसूल व वनविभागाच्या वतीने रोटरी क्‍लबच्या साह्याने येथे बंधारा बांधण्याचा निर्णय झाला असून, त्याचा ग्रामस्थ व वन्य प्राण्यांना फायदा होईल,’’ असे वेळवळीचे सुभाष डोळस यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com