Shivsena News: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! ठाकरे गटाची शाखा पूर्णपणे शिंदेंच्या शिवसेनेत होणार विलीन | Uddhav Thackeray News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray and Eknath Shinde

Shivsena News: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! ठाकरे गटाची शाखा पूर्णपणे शिंदेंच्या शिवसेनेत होणार विलीन

Shivsena News: राज्यात सत्तासंघर्ष झाला एकनाथ शिंदे आणि समर्थकांनी बंड केलं आणि सत्तेतून बाहेर पडले. शिंदे आणि समर्थक आमदारांनी भाजपच्या सोबतीने राज्यात नव्याने सत्ता स्थापन केली.

यानंतर शिवसेना हा पक्ष कोणाचा यावर प्रश्न निर्माण झाला हा वाद सुप्रीम कोर्टात गेला. या घडामोडी सुरू असतानाच निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्हं दिलं.

त्यानंतर खरी शिवसेना ही शिंदे यांची आहे म्हणत ठाकरे गटाचे अनेक समर्थक आमदार, खासदार, मंत्री, पदाधिकारी यांनी शिंदे यांच्या गटात प्रवेश करू लागले आहेत.

दरम्यान अंबरनामधील उद्धव ठाकरे गटातील शहर प्रमुखांपासून शेकडो पदाधिकाऱ्यांनी अखेर ठाकरे गटाला रामराम ठोकत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत रविवारी संध्याकाळी प्रवेश केला.

बंडखोरीनंतर गेले नऊ महिने अंबरनाथ शहर शाखा ठाकरे समर्थकांच्या ताब्यात असताना रविवारी याच निष्ठावंत ठाकरे समर्थकांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची छायाचित्रे शहर शाखेतून हटवली. त्यामुळे अंबरनाथमध्ये पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंचे यांनी एकहाती वर्चस्व मिळवले असून उद्धव ठाकरे गटाचे अस्तित्व संपुष्टात आले आहे.

अंबरनाथमधील ठाकरे गटाचे जवळपास सर्वच पदाधिकारी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज हे पदाधिकारी राजीनामे देण्याची शक्यता आहे. यापुढे अंबरनाथमध्ये एकच शिवसेना असेल, अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिलीय.

अंबरनाथचे ठाकरे गटाचे शहरप्रमुख श्रीनिवास वाल्मिकी यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी रविवारी रात्री उशिरा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत सर्वच पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनीही यापुढे अंबरनाथ शहरात एकच शिवसेना असेल. पूर्वीप्रमाणे सगळे एकत्र काम करतील अशी प्रतिक्रिया दिली.

काय आहे स्थानिक राजकारण?

राज्यात एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतून फारकत घेतल्यानंतर अंबरनाथ शहरातील आमदार डॉ. बालाजी किणीकर यांचा गट पहिल्या दिवसापासून शिंदे यांच्यासोबत होता. मात्र आमदार किणीकर आणि शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्यात वितुष्ट असल्यामुळे वाळेकर गट ठाकरे गटातच होता.

काही दिवसांपूर्वी काही पडद्यामागील घडामोडी घडल्या. त्यानंतर अचानक अरविंद वाळेकर आणि त्यांच्या परिवाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेत आपण शिंदे गटात प्रवेश केल्याचं स्वतःच जाहीर केलं होतं.

मात्र त्यांचे सर्व समर्थक ठाकरे गटातच थांबले होते. इतकंच नव्हे, वाळेकर यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेले श्रीनिवास वाल्मिकी यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना थेट शहरप्रमुख पद देण्यात आलं होतं.

वाळेकर गटाच्या प्रवेशाला आमदार किणीकर गटाचा विरोध असल्याचीही चर्चा होती. मात्र अखेर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रविवारी या सर्वांशी संवाद साधला आणि वाळेकर गट सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेत आला आहे.