बड्या कॉंग्रेस नेत्यांना भाजपची ऑफर

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

सन्मान करण्याबरोबरच इडा-पीडा नष्ट करण्याचे आश्‍वासन

सन्मान करण्याबरोबरच इडा-पीडा नष्ट करण्याचे आश्‍वासन
मुंबई - नारायण राणे यांचा भाजप प्रवेश फसला असला, तरी कॉंग्रेसच्या जवळपास सर्वच बड्या नेत्यांना भाजपने पनपंसत ऑफर दिली आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यास या नेत्यांचा योग्य तो बहुमान करण्यात येईलच. तसेच त्यांच्यावरील इडा-पीडा नष्ट होतील आणि दगडाखाली अडकलेले त्यांचे हातही सुटतील, असे आश्वासन भाजपच्या बड्या नेत्यांनी दिल्याची माहिती कॉंग्रेसच्या सूत्रांनी दिली.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्यास त्यांच्या स्वभावानुसार भाजप नेत्यांनाच डोकेदुखी होणार असल्याच्या भीतीने अनेकांनी त्यांच्या प्रवेशाला विरोध केला. तसेच राणे यांनी अमित शहा यांची भेट घेतल्याचे वृत्त फोडून राणेंचा भाजपनेच गेम केल्याची माहिती देण्यात आली. असे असले, तरी भविष्यात कॉंग्रेस हाच एकमेक तगडा विरोधक असेल, असे लक्षात आल्यावर राज्यातील कॉंग्रेस खिळखिळी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि महापालिका निवडणुकीत अन्य पक्षांतील दिग्गज नेते फोडून भाजपने त्यांना निवडून आणले आणि आपली ताकद शहरासह ग्रामीण भागातही वाढवली. भाजपला राष्ट्रवादी कॉंग्रेसची चिंता नाही; मात्र कॉंग्रेसचा इतिहास बघितल्यास कॉंग्रेस संपू शकत नाही, हे वास्तव भाजप नाकारू शकत नाही. त्यामुळे कॉंग्रेसमधील बडे नेते गळाला लावण्यास भाजपने सुरुवात केली आहे. राणे हे एक उदाहरण असले, तरी अन्य नेत्यांशीही संपर्क साधण्यात आल्याची माहिती कॉंग्रेस सूत्रांनी दिली.

कॉंग्रेसमधील बडे नेते भाजपमध्ये आल्यास त्यांची आरोपातून सुटका करणे, न्यायालयीन प्रकरणांमध्ये त्यांना दिलासा देणे आदी आश्वासने दिली असल्याचे सांगण्यात येते.

त्यांचे भविष्य घडवू!
कॉंग्रेसमध्ये हयात गेलेल्या एका माजी मुख्यमंत्र्यालाही भाजप नेत्यांनी ऑफर दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. भाजपला राज्यात पूर्ण बहुमतासाठी 22 आमदारांची आवश्‍यकता आहे. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार फुटल्यास त्यांना आर्थिक रसद पुरवू, पोटनिवडणुकीत निवडून आणू आणि त्यांचे भविष्य "घडवू' असा "शब्द' देण्यात आल्याची चर्चा आहे.

Web Title: big congress bjp officer