'कराड अस्त्र' राष्ट्रवादीवरच बुमरँग; धनंजय मुंडेंना धक्का

Dhananjay Munde
Dhananjay Munde

बीड : एकीकडे पक्षाने काँग्रेसवर कुरघोडी करत लातूर - उस्मानाबाद - बीडची जागा पदरात पाडून घेतली तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते नेते धनंजय मुंडे यांनी रमेश कराड यांना भाजपमधून फोडून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंना धक्का दिल्याचे राजकीय चित्र रंगविण्यात आले. मात्र, 'कराड अस्त्र' राष्ट्रवादीवरच बुमरँग झाले असून धनंजय मुंडे यांनाच मोठा धक्का बसला आहे. मुंडेंच्या खेळीने पक्षालाही तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे. 

लातूर - उस्मानाबाद - बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या स्थापनेपासून इथे काँग्रेसचा आमदार प्रतिनिधित्व करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर दोन निवडणुकांत या मतदार संघात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची ताकद अधिक होती. मात्र, दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या शब्दाखातर त्यांचे बंधू दिलीपराव देशमुख यांच्यासाठी ही जागा सोडली जात असे. दिलीपराव देशमुख यांनी एकदा बिनविरोध विजय मिळविला तर दोनवेळा लुटूपुटची लढत झाली.

यावेळी मात्र दिलीपराव देशमुख यांनी प्रकृतीचे कारण पुढे करत निवडणूक लढविण्यास नकार दिला. या पक्षात इतर इच्छुक राष्ट्रवादीने कुरघोडीचे आणि काँग्रेसवर नेहमीप्रमाणे डॉमिनेटींग प्रयत्न केले.

दरम्यान तोपर्यंत राष्ट्रवादीकडून अशोक जगदाळे यांच्या उमेदवारीची चर्चा सुरु झाली. जगदाळे यांनी तिन्ही जिल्ह्यांचा दौराही केला. मात्र कदाचित विजयी झाले तर भविष्यात जगदाळे वरचढ ठरतील, अशी भीती मराठवाड्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटू लागली.

त्यामुळे जगदाळे यांची उमेदवारी कापण्यासाठी आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना शह देण्यासाठी रमेश कराड यांना भाजपमधून राष्ट्रवादीत आणत त्यांना उमेदवारी देण्यात आली.

बुधवारी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार अमरसिंह पंडित, जीवनराव गोरे आदी बड्या नेत्यांच्या उपस्थितीत उस्मानाबादला पक्षप्रवेश सोहळा आणि लागलीच उमेदवारी अर्जही दाखल करण्यात आला.

या सर्व प्रक्रियेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आघाडीवर होते. पंकजा मुंडेंचे निकटवर्तीय आणि मानलेले भाऊ पक्षातून फोडल्याने त्यांना मोठा राजकीय धक्का दिल्याचे राजकीय चित्र आणि आविर्भाव राष्ट्रवादी नेत्यांनी आणला.

सोशल मीडियातून तशा पोस्टही फिरु लागल्या. मात्र, चारच दिवसांत रमेश कराड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसलाच तर तोंडघशी पाडले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणी त्यांनी अर्ज माघारी घेतल्याने धनंजय मुंडेंची खेळी पक्षाच्याही अंगलट आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली. 

तर, अशोक जगदाळे यांची उमेदवारी टाळण्यासाठी आटापिटा करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना आता त्यांनाच पाठींबा जाहिर करण्याची वेळही या बुमरँग झालेल्या कराड अस्त्रामुळे आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com