
तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या शेगावात पोलिसांची सर्वात मोठी कारवाई; ८१ आरोपींसह १ कोटी ८ लाख जप्त
शेगाव: अमरावतीच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाने शेगाव-जळगाव जामोद मार्गावरील सुळ ब्रदर्स यांच्या गौरव बार अँड रेस्टॉरंटमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून ८१ आरोपींसह १ कोटी ८ लाख १९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जुगाऱ्यामध्ये अकोला व बुलडाणा जिल्ह्यातील प्रतिष्ठित नागरिकांचा सहभाग आहे.
आरोपींकडून जप्त साहित्यात जुगाराच्या साहित्यासह, नगदी ७ लाख १२०० रुपये व ११९ मोबाईल, ३८ मोटार सायकलींचा समावेश आहे. बुलडाणा, शेगाव पोलिसांच्या नाकावर टिच्चून अमरावती पोलिस महासंचालकांनी ही कारवाई केल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
शेगाव-जळगाव जामोद रस्त्यावर सुळ ब्रदर्स यांचे गौरव हॉटेल आहे या हॉटेलमध्ये जुगार क्लब सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून अमरावती पोलीस महासंचालकांच्या पथकाने स्थानिक पोलिसांना थांगपत्ता न लागू देता काल शनिवारी (ता. ३ जून) सापळा रचला. सकाळपासून पोलिसांनी गुप्त पद्धतीने मोहीम राबवित दुपारनंतर ही धाड टाकली. या कारवाईत मोठे घबाड हाती लागले. रात्री २.३० पर्यंत ही कारवाई सुरू होती.
पोलिस निरीक्षक रामकृष्ण पहाडसिंग जाधव यांच्या फिर्यादीवरून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेले शेगाव हे जुगार अड्ड्यांचे विदर्भातील मोठे केंद्र बनले आहे. येथे ठिकठिकाणहून जुगारी पत्ते खेळण्यास येतात.
स्थानिक पोलिस आणि राजकारणी यांच्याशी जुगारी टोळीचे अर्थपूर्ण संबंध असून जवळपास ८ क्लब शेगावात चालवले जातात. शनिवारी झालेली कारवाई आजवरची सर्वात मोठी कारवाई आहे. या ठिकाणी दररोजची ५ लाख रुपयाची नाल निघत असल्याची चर्चा आहे. तर धाड पडल्यावर ३० ते ४० जुगारी शेतातून पळून गेले.
आधी भोजन, नंतर धाड
धाड टाकण्यापूर्वी पथकामधील वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी शेगावमध्ये येऊन या हॉटेलमधील जुगाराची बाहेरून पाहणी केली. त्यानंतर याच हॉटेलमध्ये सकाळी भोजन केले. त्यानंतर सापळा रचला व अमरावतीचा आदेश मिळताच ही मोठी कारवाई केली.
हॉटेल गौरव मधील जुगारावर धाड टाकणाऱ्या पथकात एकूण ३० पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश होता. विशेष म्हणजे यात यवतमाळ, दारव्हा येथीलही कर्मचारी होते.