'बर्ड फ्लू'चे निदान राज्यात होणार, पशुरोगांच्या निदानासाठी प्रयोगशाळा उभारणार

मिलिंद तांबे
Wednesday, 20 January 2021

राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत पुणे येथील पशुरोग अन्वेषण विभाग या संस्थेमध्ये एव्हिएन इन्फ्ल्युएन्झा आणि इतर झुनोटिक पशुरोगांच्या निदानासाठी प्रयोग शाळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई: 'बर्ड फ्लू'चे निदान राज्यातच करता येणे शक्य होणार आहे.  राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत पुणे येथील पशुरोग अन्वेषण विभाग या संस्थेमध्ये एव्हिएन इन्फ्ल्युएन्झा आणि इतर झुनोटिक पशुरोगांच्या निदानासाठी प्रयोग शाळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

'टर्न की बेसिस' तत्वावर जैव सुरक्षा स्तर-2 आणि  जैव सुरक्षा स्तर-3 प्रयोगशाळेची उभारणी करण्यात येणार आहे. प्रयोगशाळेची उभारणी करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय मंजूरी ही मिळाली आहे. या प्रकल्पास 75 कोटी 61 लाख 50 हजार रुपये खर्च अपेक्षित असून त्याला ही वित्तीय मान्यता मिळाली आहे.

राज्यात उद्भवलेल्या पक्षांमधील एव्हिएन इन्फ्ल्युएन्झाच्या म्हणजेच 'बर्ड फक्यु' प्रादुर्भावाचे निदान राष्ट्रीय स्तरावरील उच्च सुरक्षा पशुरोग निदान प्रयोगशाळा, भोपाळ या संस्थेकडून केले जाते. सदरची प्रयोगशाळा ही राष्ट्रीय स्तरावरील एकमेव संस्था असल्यामुळे, रोग निदानासाठी रोग नमुने या संस्थेकडे पाठविल्यानंतर रोगाचे निदान होण्यासाठी अधिकचा कालावधी लागतो.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अशा प्रकारची प्रयोगशाळा राज्यात स्थापन झाल्यानंतर एव्हिएन इन्फ्ल्युएन्झा सारख्या घातक आणि इतर आजाराचे निदान लवकर होण्यासाठी मदत होणार आहे. निदान अहवाल लवकर प्राप्त होणार आहेत. या सोबतच इतर राज्यांना देखील या प्रयोगशाळेचा फायदा होणार आहे.

सदर जैव सुरक्षा स्तर-2 आणि जैव सुरक्षा स्तर-3 प्रयोगशाळा राष्ट्रीय कृषी विकास योजनअंतर्गत निधी प्राप्त होताच प्रथम प्राधान्याने प्रयोगशाळेचे कामकाज सुरू करण्यात येणार आहे. एव्हिएन इन्फ्ल्युएन्झा या रोगाच्या विषाणूमधील एच (Haemaghutinin) आणि एन (Neuraminidase) या प्रोटीन्सवर आधारित वर्गीकरण करण्यात आले असून, एच च्या 17 स्ट्रेन आणि एन च्या 9 स्ट्रेन आहेत.

हेही वाचा- राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या विषयावर घोळ घालतंय'

सध्या पुणे येथे प्रयोगशाळेत एच या स्ट्रेनचे निदान होऊ शकते. मात्र जैव सुरक्षा स्तर-3 प्रयोगशाळा कार्यान्वित झाल्यास एच आणि एन या दोन्हीही स्ट्रेनचे निदान करता येऊ शकेल. या प्रयोगशाळेचे काम लवकरात लवकर सुरू करून पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील.
अनुप कुमार, प्रधान सचिव, पशु संवर्धन विभाग

----------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Bird flu will diagnosed set up Maharashtra laboratory


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bird flu will diagnosed set up Maharashtra laboratory