‘लेक’ आवडे महाराष्ट्राला..!

सकाळ न्यूज नेटवर्क 
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

महाराष्ट्रात गेल्या सहा वर्षांत मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढत असून, राज्यातील माता-पित्यांना लेकीचा जन्म आवडू लागल्याचे समाधानकारक चित्र आहे. मुलांच्या तुलनेत सरासरीने मुलींच्या जन्माची संख्या हळूहळू वाढत असल्याचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नागरी नोंदणी यंत्रणेच्या सर्वेक्षणात दिसून आले आहे.

मुलींचा जन्मदर वाढला; सिंधुदुर्गात ९६५ इतका जन्मदर

मुंबई - महाराष्ट्रात गेल्या सहा वर्षांत मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढत असून, राज्यातील माता-पित्यांना लेकीचा जन्म आवडू लागल्याचे समाधानकारक चित्र आहे. मुलांच्या तुलनेत सरासरीने मुलींच्या जन्माची संख्या हळूहळू वाढत असल्याचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नागरी नोंदणी यंत्रणेच्या सर्वेक्षणात दिसून आले आहे.

२०१३ मध्ये मुलींच्या जन्माचे लिंगप्रमाण एक हजार मुलांमागे फक्त ९०० होते, जे २०१३-२०१४ मध्ये ९१४ वर सुधारले गेले. पण, २०१५ मध्ये हे प्रमाण कमी होऊन ९०७ वर पोचले. २०१६ आणि २०१७ मधील जन्मनोंदणीचे प्रमाण अनुक्रमे ९०४ आणि ९१३ आहे. २०१८ च्या ताज्या अहवालानुसार हे प्रमाण ९१६ वर सुधारले आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रातील शहरी भागात हजार मुलांमागे मुलींची संख्या ९२० होती. ग्रामीण भागात हे प्रमाण एक हजार मुलांमागे ९०३ मुली असे आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नागरी नोंदणी यंत्रणेच्या (सीआरएस) आकडेवारीनुसार कोकणातील सिंधुदुर्गात मुलींच्या जन्माचे प्रमाण ९६५ असून, याबाबतीत हा जिल्हा राज्यात अव्वल आहे. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील आदिवासीबहुल जिल्हा असलेल्या नंदुरबारमध्ये हजार मुलांमागे ९५४ मुली जन्माला येतात. रत्नागिरीतही ९५३ एवढा स्त्री जन्मदर आहे.

स्री जन्मदराच्या तळाशी असलेल्या जिल्ह्यांमध्ये बुलडाणा (८५७), कोल्हापूर (८७०) आणि जालना (८७९) यांचा समावेश आहे.

नोंदणीकृत कार्यक्रमांवर आधारित मुंबईतील लिंग प्रमाण ९३९ आहे; तर ठाणे, पालघर, पुणे आणि रायगडमध्ये अनुक्रमे ९२६, ९२८, ९१४ आणि ९१६ असे आहे. आरोग्य विभागाने लिंग प्रमाणातील वाढीचे श्रेय प्री-नताल डायग्नोस्टिक टेक्‍निक (नियमन आणि गैरवापर प्रतिबंध) कायद्याच्या (पीसीपीएनडीटी) अंमलबजावणीला दिले आहे.

पीसीपीएनडीटी कायदा आणि ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही मोहीम कठोरपणे राबविली गेली, तर स्री जन्मदर प्रमाणातील सुधारणा आणखी चांगली होऊ शकते.
- रवींद्रकुमार जाधव, बालमानस व सामाजिक समस्या विश्‍लेषक
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Birth rates of girls increased