शिवसेनेतल्या वाढत्या प्रवेशांची भाजपला धास्ती...! 

संजय मिस्कीन
गुरुवार, 25 जुलै 2019

जयदत्त क्षिरसागर यांच्यानंतर आता मुंबईतून सचिन अहिर, पालघरमधून पांडूरंग बरोरा या आमदारांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने स्थानिक पातळीवर भाजपला तोडीस तोड असे नेतृत्व उभे राहिल्याचे मानले जाते.

मुंबई : सत्तापालटानंतर राज्यात नंबर एकचा पक्ष बनलेल्या भारतीय जनता पक्षाला उड्डाणाला शिवसेनेतल्या वाढत्या पक्षप्रवेशांची धास्ती लागल्याचे चित्र आहे. जयदत्त क्षिरसागर यांच्यानंतर आता मुंबईतून सचिन अहिर, पालघरमधून पांडूरंग बरोरा या आमदारांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने स्थानिक पातळीवर भाजपला तोडीस तोड असे नेतृत्व उभे राहिल्याचे मानले जाते.  संजय दिना पाटील देखील शिवसेनेत दाखल होतील अशी अटकळ बांधली जात आहे. 

मुंबई, ठाणे व कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. याच पट्ट्यात राष्ट्रवादीतले अनेक नेते शिवसेना प्रवेश करण्यास पसंती देत आहेत. त्यामुळे युतीच्या जागावाटपात शिवसेनेचाही दावा वाढत असल्याने आगामी निवडणूकांत शिवसेना-भाजप युतीत जागावाटप समिकरणावर तोडगा काढण्याची कसोटी आहे. 

मुंबईत भाजपला युतीत निम्म्या जागा हव्या आहेत. पण शिवसेना मुंबईत सर्वाधिक जागांवर दावा करणार आहे. अशा स्थितीत भाजपला विद्यमान आमदारांना डावलून मतदारसंघ शिवसेनेला साेडणे अवघड आहे. कोकणातून आमदार अवधूत तटकरे, भास्कर जाधव देखील शिवसेनेत प्रवेश करतील असा दावा केला जात आहे. 

मुंबई ठाणे सह सोलापूर मधून बार्शीचे आमदार दिलीप सोपल, माढ्याचे आमदार बबन शिंदे हे देखील शिवसेनेच्या वाटेवर असल्याने शिवसेनीची वाढती ताकद भाजपसाठीही आव्हान ठरणार असल्याची चर्चा आहे.

त्यातच शिवसेनेनं सत्तेत असतानाही सतत सरकारच्या विरोधात शेतकरी कर्जमाफी, पिकविमा या प्रश्नावरून राज्यव्यापी आंदोलन छेडली आहेत. ऐन दुष्काळात उध्दव ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी दुष्काळग्रस्त भागात दौरे काढून शेतकर्यांच्या पाठिशी शिवसेना असल्याचा प्रचार जोरात केला आहे. दुष्काळग्रस्त शेतकर्यांना मदत व जनावरांना चारा वाटप करण्यात शिवसेनेनं बाजी मारली आहे. त्यामुळे विरोधी पक्षातले स्थानिक नेत्यांचे  प्रवेश व शेतकर्यांच्या समस्यांवर केलेल्या उपाययोजना ही शिवसेनेसाठी आगामी निवडणूकांत प्रचारासाठीची मोठी रसद मानली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP afraid of number of politicians enters in Shivsena