दिल्लीश्‍वरांची मर्जी अन्‌ भाजपमधील ‘शांतता’

Devendra Fadnavis - Vinod Tawde
Devendra Fadnavis - Vinod Tawde

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याविषयी संघपरिवाराच्या मनात आदर आहे अन्‌ भाजपाईंच्या मनात आदरमिश्रित दहशत. त्यांचे निर्णय काहीही न बोलता निमूटपणे स्वीकारण्याची पद्धत पक्षात रुजली आहे. १०५ जागा जिंकल्यानंतरही सत्तास्थापनेचा दावा केला गेला नाही, तो दिल्लीच्या सांगाव्यामुळे. ‘जे घडते आहे ते पाहा, बाकी आमच्यावर सोडा,’ असे या दोघांच्या हाताखालील चमूने कळविले आहे. ते कसोशीने पाळले जात आहे. त्यामुळे भाजपमध्ये सारे काही शांत आहे. ‘शिवसेनेला अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद देण्याचा शब्द अमित शहा यांनी दिला होता,’ असे उद्धव ठाकरे म्हणतात. ‘तसे घडलेच नाही,’ असे महाराष्ट्रातील नेते दिल्लीश्‍वरांच्या पवित्र्यामुळे सांगतात. गेले तीन आठवडे भाजप व शिवसेनेत या वाक्‍याच्या पलिकडे काही घडलेले नाही. त्यापलिकडे काही करू नका, असा श्रेष्ठींचा निरोप आहे.

नरेंद्र मोदी यांच्या निकटवर्तुळात स्थान मिळविलेले देवेंद्र फडणवीस यामुळे शांत आहेत. ते मोदींच्या निरोपाला डावलून काही करतील, अशी शक्‍यता कमी. खरे तर शिवसेनेने वारंवार भाजपला झुकविले. भाजपनेही त्यांची कोंडी करीत मनात जे येईल ते मिळवून घेतले. हे सर्व हिंदुत्वाच्या नावाने झाले. त्यामुळे खरे तर कोंडी निर्माण झाल्यावर दिल्लीचा एक फोनही अविश्‍वासाचे मळभ दूर करणारा ठरला असता. पण मोदी, शहा आणि ठाकरे यांच्या व्यक्तिगत अहंकाराची लढाई सुरू आहे. मोदी ठाकरेंना परत या, अशी हाक देत नाहीत आणि उद्धव ठाकरेही मुख्यमंत्रिपदाचा हट्ट सोडत नाहीत. परस्परांवर कुरघोडी करणाऱ्या या राजकारणात महाराष्ट्राचे भले नाही.

गळ्यात गळे
परस्परांच्या अहंकारात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला संधी दिसली. आता हे पक्ष सत्तेत परतण्याचा मार्ग शोधू शकले आहेत. अस्तित्वासाठी धडपडणारी चौथ्या क्रमांकावरची काँग्रेस सत्तेत परतण्याचे मनसुबे आखते आहे. परस्परांवर प्रचंड चिखलफेक करणारे हे पक्ष एकीचे गान गाण्यास सिद्ध झाले आहेत. सत्ता हा त्यांच्यातला एकमेव धागा. गेली पाच वर्षे सातत्याने प्रत्येक निवडणूक जिंकणारे देवेंद्र फडणवीस सध्या मात्र निश्‍चल झाले आहेत. शिवसेनेला मर्यादेत ठेवण्याच्या मिषाने सुरू केलेला पाडापाडीचा डाव सहकारी कच्चे असल्यामुळे त्यांना जिंकता आला नाही. स्वबळावर बहुमत असते, तर दिल्लीकरांवर अवलंबून राहावे लागले नसते. प्रचंड मेहनत करतानाच घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोचवणारा चमू त्यांना उभा करता आला नाही. शिवाय नको त्या वेळी फडणवीस ‘भावी पंतप्रधान’ असल्याचा प्रचार सुरू झाला. असा प्रचार त्रासदायक असतो. तो थांबवण्याचे प्रयत्न फडणवीसांनी केले असतील, हे निश्‍चित. पण, ते त्यांना साधले नाही. परिणामस्वरूप आज १०५ जागा जिंकलेल्या फडणवीसांना माध्यमात कुठेही स्वतःचे स्थान मिळवता आलेले दिसत नाही. तरुण वयात मुख्यमंत्री होणाऱ्या बहुतेकांना ते पद राखणे जमले नाही. शिवसेनेला सांभाळून घेण्याचे प्रयत्न त्यांनी सातत्याने केले. मुंबईचे महापौरपदही शिवसेनेकडे वळू दिले. पण, आज हा मित्रही स्वतःच्या मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेखातर त्यांना विचारेनासा झाला आहे. दिल्लीश्‍वरांची मर्जी काय असते, ते आता महाराष्ट्र भाजपला खऱ्या अर्थाने समजत असावे. निकाल घोषित होण्याआधीच दिल्ली भाजपने प्रदेश मुख्यालयासह मोठा मंडप उभारायचे आदेश मुंबईला पाठवले होते. त्या वेळी ‘जरा थांबूयात’ असे म्हणण्याचे धैर्य ज्या महाराष्ट्राकडे नव्हते, ते नेते आता ‘आम्हाला आमच्या मार्गाने जाऊ द्या, जनादेश प्रत्यक्षात आणू द्या,’ असे दिल्लीश्‍वरांना म्हणण्याची शक्‍यता कमी आहे. सत्तेची संधी अहंकार आणि अपमानात गमवायची नसते, हे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसला चांगलेच कळते. त्यामुळेच ते शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देत अधिकाराची पदे, महत्त्वाची खाती स्वतःकडे खेचण्याचे डाव आखत आहेत. जनादेश नसला, तरी सरकार स्थापन करण्याची संधी गमवायची नसते, हे समजण्याइतके शहाणपण त्यांच्यात आहे. सामना जिंकूनही तो गमावण्याचा, अडीच वर्षांची संधी नाकारता नाकारता महाराष्ट्रासारखे राज्य गमावण्याचा भाजपचा बाणा अनाकलनीय आहे.

टोकाची भूमिका कशासाठी?
गोवा, मणिपूर यासारख्या छोट्या; बिहार, जम्मू-काश्‍मीरसारख्या मोठ्या राज्यांमध्ये येनकेन प्रकारेण सत्ता मिळवणारा भाजप महाराष्ट्राबाबत शांत का? असा प्रश्‍न विचारलाच तर ‘दिल्ली सगळे बघते आहे,’ असे उत्तर मिळते. पूर्वी ‘बिग बदर इज वॉचिंग यू’ असे चित्र होतेच, ते आता ‘बिग ब्रदर इज नॅव्हिगेटिंग यू’ असे झाले आहे. एकीकडे, देशात वाढता पाठिंबा मिळत असताना सतत दूषणे देणाऱ्या सहकारी पक्षाबद्दल राग मनात असेल ते समजण्यासारखे; पण अशा अवमान मालिकेमुळे जनादेश झुगारण्याइतके टोकाला जायचे काय? काही दिवसांत हे सरकार कोसळेल आणि पदासाठी काहीही करणाऱ्या शिवसेनेला आपण जागा दाखवू शकू, असे मोदी-शहांच्या मनात असेल तर ते खरेच होईल, याची खात्री भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला असावी. पण, सारेच काही मनासारखे घडते, असे नाही. सरकार न स्थापणे जनतेला आवडलेले नाही. राजकारणात दोन पावले पुढे जाण्यासाठी कित्येकदा चार पावले मागे यायचे असते. आज महाराष्ट्रात कोणताही समान धागा नसलेले तीन पक्ष एकत्र येण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्याचे कारण शिवसेनेची सत्ताकांक्षा, काँग्रेस राष्ट्रवादीला दिसत असलेली संधी, हे असेलही; पण दिल्लीश्‍वरांची मर्जी हे त्यामागचे खरे इंगित आहे. त्यात महाराष्ट्राचे भले होईल न होईल; भाजपचे नुकसान होण्याची शक्‍यता आहेच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com