शिवसेना माजलेला बैल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जानेवारी 2017

भाजपची ठाण्यात कडवट टीका

भाजपची ठाण्यात कडवट टीका
ठाणे - शिवसेनेने भाजपला बैलाची उपमा दिल्यानंतर भाजपनेही शिवसेनेला माजलेला बैल म्हणून संबोधले असून या निवडणुकीत वेसण घालून 66 जागा मिळवीत भाजपचा महापौरच ठाणे महापालिकेच्या खुर्चीवर बसेल, असा विश्वास भाजपच्या पधाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. युतीचा प्रयत्न निष्फळ झाल्यानंतर आज ठाण्यात प्रथमच भाजपने विजयी संकल्प मेळावा घेतला. त्या वेळी या पक्षाच्या नेत्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली.

मेळाव्यात आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, संपर्कमंत्री आमदार रवींद्र चव्हाण, विभागीय अध्यक्ष खासदार कपिल पाटील, आमदार संजय केळकर, माधवी नाईक, ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले, संजय वाघुले आदी नेते उपस्थित होते. संदीप लेले यांनी मेळाव्याच्या सुरुवातीलाच शिवसेनेचा समाचार घेताना माजलेल्या बैलाला वेसण घालण्याची वेळ आल्याची टीका केली. मित्रपक्षाला युती तोडल्याबद्दल धन्यवाद देत आहे. ठाण्यातील सीआरझेडचे मुद्दे असतील, मेट्रो असेल, झोपडपट्टी पुनर्विकास असेल आदींसह इतर कामे केली भाजपने, परंतु श्रेय घेण्याचे काम मात्र शिवसेना करीत असल्याची टीका केली.

ठाण्यातील टक्केवारीच्या राजकारणाला आता वठणीवर आणण्याची वेळ आली असून, भ्रष्टाचारमुक्त ठाणे आणि ठाण्याचा कारभार हा पारदर्शकपणा करण्यासाठी आपल्याला प्रत्येक मतदात्यापर्यंत पोहचविण्याची वेळ आल्याचे संजय केळकर यांनी सांगितले.

आता नशिबावर अवलंबून चालणार नाही, आता खऱ्या अर्थाने मेहनतीची गरज आहे. ठाण्यात परिवर्तन झालेच पाहिजे. आता ठाणे तिथे काय उणे म्हणण्याची वेळ आली असून त्यासाठी भाजपला साथ देऊन ठाण्याचा विकास केला पाहिजे, असे मत खासदार कपिल पाटील यांनी या वेळी व्यक्त केले.

रिश्‍तें में तो हम तुम्हारा बाप होते है, असे म्हणत केंद्रात, राज्यात आणि आता सर्वच ठिकाणी भाजप हा सगळ्यांचा बाप असून प्रत्येकाला आता हे समजावण्याची वेळ आल्याचे टोला माधवी नाईक यांनी या वेळी लगावला.

Web Title: bjp comment on shivsena