बहुमत सिद्ध करायला 14 दिवस द्याः भाजप

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

विधानभवनामध्ये बहुमत सिद्ध करायला 14 दिवस द्या, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्याकडे केली आहे. परंतु, राज्यपालांनी अद्याप वेळ दिलेली नाही.

पुणे: विधानभवनामध्ये बहुमत सिद्ध करायला 14 दिवस द्या, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्याकडे केली आहे. परंतु, राज्यपालांनी अद्याप वेळ दिलेली नाही.

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली असल्यामुळे सरकार स्थापन झाले आहे. पण, बहुमत सिद्ध करायला आमदारांचे पाठबळ हवे आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपने राज्यपालांकडे 7 डिसेंबरची मुदत मागितली आहे. पण, अद्याप वेळ दिलेली नाही. दरम्यान, राज्यातील नाट्यमय घडामोडींनंतर भाजपचा संभाव्य डाव उधळून लावण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकार स्थापन करण्याच्या जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांकडे 162 आमदारांचे सह्या असणारे पत्र राज्यपालांकडे सोपवले असून, भाजप बहुमत सिद्ध करण्यास अपयशी ठरल्यानंतर सत्तास्थापनेसाठी आम्हाला संधी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राजभवनात पत्र सोपवण्यात आल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी राज्यपाल सांगतील तेव्हा आपण सर्व 162 आमदारांची राज्यपालांसमोर परेड करण्यास तयार असल्याचं सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP demands to governor more time to prove majority in Maharashtra assembly