भाजप कॉंग्रेसचा पाठिंबा घेणार नाही - फडणवीस

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

शिवसेनेला टोला : कोणाला पाठिंबा घ्यायचा आहे त्यांनी घ्यावा
मुंबई - ज्यांना कोणाला कॉंग्रेसचा पाठिंबा घ्यायचा आहे त्यांनी घ्यावा. मात्र कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्ष कॉंग्रेसचा पाठिंबा घेणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले.

शिवसेनेला टोला : कोणाला पाठिंबा घ्यायचा आहे त्यांनी घ्यावा
मुंबई - ज्यांना कोणाला कॉंग्रेसचा पाठिंबा घ्यायचा आहे त्यांनी घ्यावा. मात्र कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्ष कॉंग्रेसचा पाठिंबा घेणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले.

याबरोबरच ही विश्‍वासाची लाट होती, असाही टोला शिवसेनेला त्यांनी हाणला आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीतील यशाचा आनंद साजरा करण्यासाठी भाजप प्रदेश कार्यालयात सायंकाळी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आदींनी शनिवारी सकाळी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले.

फडणवीस म्हणाले, की लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेतला होता. विधानसभा निवडणुकीतही आपण शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेतला होता. महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीतील विजयानंतर रायगडावर शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेतला व आव्हानांचा सामना करण्यासाठी ऊर्जा घेऊन आलो आहे. त्याच्या आधारे जनतेसाठी चांगले काम करून दाखविणार आहे. ते पुढे म्हणाले, की महापालिका निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून, इतर सर्वांच्या नगरसेवकांच्या संख्येची बेरीज केली, तरी त्यापेक्षा जास्त नगरसेवक भाजपचे आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. समाजाच्या सर्व घटकांनी भाजपवर विश्वास दाखविला आहे. ही विश्‍वासाची लाट होती. त्यामुळे काही जणांना वाटत होते, की विधानसभा निवडणुकीत लाटेवर विजय मिळवला होता; मात्र तसे झाले नाही हे निकालावरून सिद्ध होते. मोदी यांनी देशात पारदर्शी, प्रामाणिक राजकारण सुरू केल्यामुळे जनतेमध्ये विश्वास निर्माण झाला असून, सर्वत्र भाजपला यश मिळत आहे.

'महापालिका व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीतील यश आपण रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी सादर केले असून त्यांच्या आशीर्वादाने जनतेसाठी चांगले काम करून दाखविण्याची ऊर्जा घेऊन आलो आहोत.''
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

भाजपला हिणविणाऱ्यांना जनतेने या निवडणुकीत उत्तर दिले आहे. केवळ शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागातही भाजपची पाळेमुळे घट्ट रुजल्याचे निकालावरून दिसते.
- रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

Web Title: bjp do not support by congress