भाजपमध्ये प्रवेशास अनेकजण रांगेत - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 25 May 2018

मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिलेले निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. समाजातील विविध क्षेत्रांतील चांगल्या लोकांना भाजपत काम करण्याची संधी मिळते. एक चांगला कार्यकर्ता म्हणून निरंजन डावखरेंना भाजपमध्ये प्रवेश दिला असून, भाजपत प्रवेश करण्यासाठी अजून खूप लोक रांगेत आहेत, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार नरेंद्र पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

आमदारकीचा राजीनामा दिलेले निरंजन डावखरे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचे स्वागत केले. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड आणि प्रसाद लाड, भाजप ठाणे विभाग अध्यक्ष कपिल पाटील, प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये व अतुल शाह; तसेच अतुल सावे व जगदीश मुळीक उपस्थित होते. या वेळी अकोल्याचे नगरसेवक गोपी महादेवराव ठाकरे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

निरंजन डावखरे हे पुन्हा एकदा कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडून येतील, असा विश्वास व्यक्त करून फडणवीस यांनी अजून खूप लोक रांगेत आहेत; त्याबाबत आताच काही बोलणार नाही, परंतु योग्य वेळ येताच ते सर्वांना समजेल असे सांगितले. त्यामुळे निरंजन डावखरे यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार नरेंद्र पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Entry line Devendra fadnavis politics