भाजपची अवस्था इकडे आड तिकडे विहीर

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 9 एप्रिल 2018

आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप अशी युती झाली, तर मी भाजपमध्ये राहणार नाही. 
- नारायण राणे, खासदार

मुंबई - मूळचे शिवसैनिक असलेले नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातून विस्तव जात नाही. त्यामुळे नारायण राणे यांना भाजपने जवळ केले तर शिवसेना हा भाजपचा मित्रपक्ष दुखवतो, तर शिवसेनेला भाजपने चुचकारले तर नारायण राणे नाराज होतात, अशा दुहेरी कात्रीत भाजप सापडला आहे. त्यामुळे भाजपची अवस्था ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी झाली आहे.

नारायण राणे यांना राज्य मंत्रिमंडळात समावेश करून घेण्यास शिवसेनेने तीव्र विरोध केला. राणे यांना भाजपने मंत्रिमंडळात घेतले तर शिवसेना आपणहून सरकारमधून बाहेर पडेल, असा धमकीवजा इशारा शिवसेनेने भाजपला दिला होता. आपला मंत्रिमंडळ प्रवेश केवळ शिवसेनेच्या तीव्र विरोधामुळे हुकल्याची खंत राणे यांना आहे. त्यामुळे राणे यांना स्वतंत्र पक्ष  स्थापन करून भाजपप्रणीत एनडीएत सामील व्हावे लागले. त्यांना इच्छा नसताना भाजपकडून राज्यसभेवर जावे लागले असल्याचे राणे यांचे निकटवर्तीय सांगतात. त्यामुळे राणे हे शिवसेनेला विरोध करणार हे जाहीर आहे; मात्र सध्याचे देशातील राजकीय वातावरण पाहता २०१९ मध्ये केंद्रात भाजपचे सरकार पुन्हा येण्यासाठी भाजपला घटक पक्षांची गरज भासणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शिवसेना हा भाजपचा सर्वांत जुना मित्र असून त्यास मुकणे भाजपला परवडणारे नाही. म्हणून भाजपची मागील काही दिवसांपासून शिवसेनेबाबतची भाषा बदललेली दिसत असल्याचे राजकीय जाणकार मत व्यक्त करतात. त्यामुळे राणे आणि शिवसेना या दोघांना नाराज करणे भाजपला फायद्याचे नाही, याची जाणीव भाजपला आहे. ही कसरत भाजपला करावी  लागणार आहे.

Web Title: BJP found double cam