महाराष्ट्राचे तुकडे करायला जाल तर उभे चिरू- उद्धव

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

मुंबई - ही फ्रेंडली मॅच नाही, आमच्या अस्मितेची लढाई आहे, अशा शब्दांत भाजपला ठणकावतानाच संयुक्त महाराष्ट्राला मतदान करणार की महाराष्ट्राचे तुकडे करणाऱ्यांना? अशी भावनिक साद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदारांना घातली. 

गिरगाव येथे उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या प्रचाराचा नारळ शनिवारी (ता. 4) वाढवला. त्यानंतर त्यांनी भाजपला आव्हान दिले. संकटाच्या काळात तुमच्या मागे उभा राहणारा मित्र तुम्ही गमावलात. मनात काळेबेरे ठेवून हात पुढे करणाऱ्यांशी युती नाही, असे खडेबोल उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले. यांचे अध्यक्ष भाजप आणि शिवसेनेची फ्रेंडली मॅच म्हणतात, पण लिंबू-टिंबू महाभारत म्हणतात. महाभारत असेल तर श्रीखंडी-पाखंडी कोण, ते ठरवा. कौरव-पांडवांमध्ये फ्रेंडली मॅच होऊ शकत नाही, असा घाणाघात त्यांनी भाजपवर केला. महाराष्ट्राचे तुकडे करायला जाल तर उभे चिरू, असा हल्ला चढवत त्यांनी भाजपचा स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा लक्ष्य केला. कॉंग्रेसला रस्त्यातील खड्डे दिसत आहेत. म्हणूनच त्यांना लोकांनी खड्ड्यात घातले, असा टोला कॉंग्रेसला लगावला. 

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केले. मुख्यमंत्री शिवसेनेला औकात दाखवणार आहेत. शिवसेनेला आव्हान देणारा पुढच्या राजकारणात दिसत नाही. शिवसेनेला संपवणारे संपले, असा हल्ला त्यांनी मुख्यमंत्र्यांवर चढवला. आता फक्त भगवा फडकणार, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. केंद्राने जाहीर केलेल्या पारदर्शकतेच्या अहवालामुळे त्यांची बोबडी वळली आहे, असा चिमटा काढतानाच परिवर्तनाची घाई असेल, तर सर्व निवडणुका आताच घ्या, करून दाखवतो परिवर्तन, असे ते म्हणाले. साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी महाराष्ट्राचा नकाशा बदलू नका, म्हणून मुख्यमंत्र्यांना सांगितले. त्याबद्दल त्यांचे कौतुकही त्यांनी केले. 

मोदी समितीचे अध्यक्षही होतील 
लोकसभा विधानसभेपासून सोसायट्यांच्या निवडणुकीपर्यंत पंतप्रधान, मुख्यमंत्री फिरताहेत. त्यांचे कारभाराकडे लक्ष नाही. वेळ पडल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी पालिकेच्या बाजार, उद्यान समितीचे अध्यक्ष होतील. त्यांच्याकडे दुसरा चेहराच नाही, असा चिमटा त्यांनी काढला. उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांना पीककर्ज माफीचे वचन भाजपने दिले आहे. मग महाराष्ट्रात तुमचे सरकार नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com