पंकजांसह चार मंत्री धोक्यात, तर 'या' दोन जागांवर पराभव; भाजपचा अंतर्गत सर्व्हे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

भाजपच्या मंत्रीमंडळात सध्या असलेले परळी मतदारसंघातून पंकजा मुंडे, वांद्रे पश्चिममधून आशिष शेलार आणि कर्जत-जामखेडमधून राम शिंदे यांना कडवी लढत मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच परिणय फुके यांना साकोली मतदारसंघात काँग्रेसच्या नाना पटोलेंकडून मोठे आव्हान आहे.

मुंबई : राज्यात शिवसेनेसोबत पुन्हा सत्तेवर येऊ असे म्हणत असलेल्या भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणात ते लढत असलेल्या 164 जागांपैकी 122 जागांवर विजय निश्चित असल्याचे समजले जात असून, 40 जागांवर जोरदार लढत होईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर, बारामती आणि मालेगाव मध्य येथे भाजपने आताच पराभव मान्य केला आहे.

'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, भाजपने आपले अंतर्गत सर्वेक्षण जाहीर केले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने हे सर्वेक्षण जाहीर करताना भाजप लढत असलेल्या 164 जागांवर 122 जागांवरील विजय निश्चित समजण्यात येत आहे. मात्र, शिवसेनेला किती जागा मिळतील आणि एकूण युतीला किती जागा मिळतील याचा अंदाज वर्तविण्यात आलेला नाही. भाजपच्या नेत्यांकडून पूर्वीपासूनच युतीला 220 जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र, भाजपने आपला 122 जागांवरील विजय निश्चित असल्याचे सांगत, 40 मतदारसंघांना डेंजर झोनमध्ये ठेवले आहे. तर, दोन मतदारसंघात पराभव मान्य केला आहे.

भाजपच्या मंत्रीमंडळात सध्या असलेले परळी मतदारसंघातून पंकजा मुंडे, वांद्रे पश्चिममधून आशिष शेलार आणि कर्जत-जामखेडमधून राम शिंदे यांना कडवी लढत मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच परिणय फुके यांना साकोली मतदारसंघात काँग्रेसच्या नाना पटोलेंकडून मोठे आव्हान आहे. या प्रमुख लढतींसह अन्य 40 ठिकाणी भाजपला चांगलीच लढत मिळत आहे. तर, बारामती आणि मालेगाव मध्य येथे भाजपने पराभव मान्य केला आहे. बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे लढत असून, येथे भाजपने गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली आहे. तर, मालेगाव मध्यमध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार आसीफ शेख जिंकतील असा अंदाज आहे.

दरम्यान, ही निवडणूक भाजपच्या 40 उमेदवारांसाठी खडतर आहे. त्यामध्ये चार विद्यमान मंत्र्यांचा समावेश आहे. महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना परळी मतदारसंघात त्यांचे चुलत बंधू धनंजय मुंडे यांच्याकडून जोरदार फाईट मिळणार आहे. त्याचबरोबर शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांना वांद्रे पश्चिम मतदारसंघात काँग्रेसचे आसिफ झकेरिया यांच्याकडून जोरदार फाईट मिळेल, असा अंदाज भाजपच्या सर्व्हेत व्यक्त करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP internal survey BJP wins 120 seats in Maharashtra Vidhan Sabha 2019 election