
Maharashtra Politics: “ज्या राष्ट्रवादीची संजय राऊत स्तुती करतात, त्याच राष्ट्रवादीचे तुकडे पाडणार”
राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडताना दिसून येत आहेत. सत्तांतर झाल्यापासून आणि सरकारमध्ये बदल झाल्यापासून शिवसेना आणि ठाकरे गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. तर दुसरीकडे 16 आमदार अपात्र होणार असल्याचे महाविकास आघाडीतील नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. अशातच ठाकरे गटाचे मुखपत्र असणाऱ्या सामना या वृत्तापत्रातून शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे.
येत्या काही दिवसात राज्यातील सत्तासंघर्षावर आणि 16 आमदारांच्या आपत्रतेवर निकाल येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. खासदार संजय राऊत यांनी 16 आमदार अपात्र होणार असल्याचे सांगितल्यानंतर आता भाजपने यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यावरूनच भाजपकडूनही संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी या विषयावर बोलताना टिका केली आहे. कोण सांगत आहे 16 आमदार अपात्र होत आहेत, अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल लिक होत असतात का असा सवालही खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे.
अपात्र आमदारांच्या मुद्यावरून प्रतिक्रिया देतानाच त्यांनी राष्ट्रवादीची स्तुती संजय राऊत करतात त्यावरूनही त्यांच्यावर टीका केली आहे. अनिल बोंडे म्हणाले की, सामनाच्या आजच्या अग्रलेखात संजय राऊत हे तोंड फाटेपर्यंत राष्ट्रवादीची स्तुती करत होते. त्याच राष्ट्रवादीचे तुकडे पाडण्यासाठी संजय राऊत अग्रलेख लिहत आहेत.

शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याच्या जाहीर केल्यानंतर त्यावरून राजकीय वातावरण ढवळून निघालं. त्यावरून सामना वृत्तपत्राने अग्रलेख लिहिताच अनिल बोंडे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. सामनाच्या अग्रलेखातून अजित पवार यांनाही टार्गेट केला जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम संजय राऊत करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे.
एकीकडे ते राष्ट्रवादीची स्तुती करतात तर दुसरीकडे संजय राऊत हे फोडाफोडीचे काम करत असतात त्यामुळे त्यांच्याकडून राष्ट्रवादीलाही ते फोडण्याचे काम सुरु असल्याचा गंभीर आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वादात आता भाजपच्या अनिल बोंडे यांनी उडी घेतल्याने हा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.