भ्रष्टाचाराचा कळस आणि फडणवीसांना अहंकार नडला; भाजपच्या नेत्याचं खुलं पत्र 

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

पवार कुटुंबाचा पराभव  करण्याची जबरदस्त आग होती तर, भाजप नेते स्वतः बारामतीतून का उभे राहिले नाहीत? असा प्रश्न उपस्थित करतच अनिल गोटे यांनी पत्राची सुरुवात केली आहे.

धुळे : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. निवडणुकीपूर्वी 220 पेक्षा जास्त आमदार निवडून येतील, असा विश्वास असलेल्या भाजपला 105 आमदार निवडून आल्यानंतरही विरोधात बसण्याची वेळ आलीय. पण, भाजपवर ही वेळ कशामुळे आली हे बोलण्यासाठी कोणी पुढे येताना दिसत नाही. पण, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी एक खुलं पत्र लिहून देवेंद्र फडणवीस यांच्या कारभाराची अक्षरशः चिरफाड केलीय. अनिल गोटे यांचे हे पत्र सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलंय. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

पत्राची सुरुवात काय? 
पवार कुटुंबाचा पराभव  करण्याची जबरदस्त आग होती तर, भाजप नेते स्वतः बारामतीतून का उभे राहिले नाहीत? असा प्रश्न उपस्थित करतच अनिल गोटे यांनी पत्राची सुरुवात केली आहे. कुणावर टीका करण्यसाठी नाही तर, वेदनेपोटी हे पत्र लिहत आसल्याचे गोटे यांनी लिहिले आहे. प्रचंड अहंकार, रात्री दहा नंतरचे दरबारी राजकारण, खुशमस्कऱ्यांचा वेढा, वायफळ बडबड आणि भ्रष्टाचाराचा कळस या कारणांमुळं भाजपच्या नेतृत्वाने स्वतःहून सत्ता घालवली, असं अनिल गोटे यांनी म्हटलंय. 

 

काय म्हटलंय पत्रात?
भाजप-सेना युतीचे शासन राज्यकर्त्यांनी स्वकर्तृत्वाने घालवले आहे. युतीच्या काळातील पहिली तीन वर्षे खऱ्या अर्थाने चांगली गेली. फडणवीस इतक्या प्रामाणिकपणे, तळमळीने आणि गतीने काम करत असतील, तर भविष्यातही आम्हाला राजकीयदृष्ट्या विचार करावा लागेल, असं मत विरोधी पक्षातील माझे मित्र व्यक्त करत होते. पण, मुंबई-पुणे महापालिकेतील अभूतपूर्व यशानंतर त्यांच्यातील सूप्त अहंकार जागा झाला. पाहता पाहता मोठा बदल दिसू लागला. समोरच्याचं सगळं ऐकून न घेता विषय संपण्यापूर्वीच स्वतःचा निर्णय जाहीर केला जाऊ लागला. आमदारांना दिलेल्या आश्वासनांचे त्वरीत विस्मरण होऊ लागले, असेही पत्रात म्हटले आहे. 

शिवसेनेला पाच वर्षे मुख्यमंत्रिपद तर आघाडीला काय?

रात्री दहानंतरचा वर्षा बंगला
रात्री दहानंतर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या सरकारी निवासस्थानी दरबारी मंडळी हळू हळू जमा होऊ लागली. खुशमस्कऱ्यांच्या आणि दरबारी नेत्यांच्या गराड्यात विरोधकांपेक्षा स्वतःच्या पक्षातील नेत्यांविरुद्धच कट कारस्थाने रचली जाऊ लागली. मंत्र्यांविरुद्ध रात्री अपरात्री अधिकाऱ्यांना आदेश दिले जाऊ लागले, असे पत्रात म्हटले आहे. 

भ्रम निर्माण केला
गिरीष महाजन, चंद्रकांत पाटील, संजय काकडे यांच्या मार्फत सूर्य-चंद्र असेपर्यंत आपली सत्ता जाणार नाही, असा भ्रम निर्माण केला गेला. मुख्यमंत्र्यांचे वय 49 आणि शरद पवार यांचे राजकीय आयुष्य 55 वर्षे, या अनुभवाच्या अंतराचेही भान त्यांना राहिले नाही, अशी टीका गोटे यांनी केलीय.

मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, असं आम्ही म्हणणार नाही; पण, : संजय राऊत

पवार आव्हान सहन करत नाहीत 
पक्षाच्या नेतृत्वाने त्यांना रोखणे गरजेचे होते. पण, कितना मजा आ रहा है, अशा भावनेत नेतृत्व अडकले आणि त्यांनी या सगळ्याकडे दुर्लक्ष केले. पवार कुटुंबाविषयी इतका द्वेष निर्माण केला गेला की, पवारांच्या पराभवासाठी चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत घर घ्यावे, एवढ्यापर्यंत भाजप नेत्यांची मजल गेली. पवार टीका सहन करू शकतात. पण, त्यांना दिलेले आव्हान ते सहन करू शकत नाहीत.  

No photo description available.

कोण आहेत अनिल गोटे?
अनिल गोटे हे भाजपचे धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळा आमदार होते. 2009 आणि 2014मध्ये त्यांनी धुळे शहराचे प्रतिनिधित्व केले. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत गोटे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. त्यांना 42 हजार 432 मते पडली. धुळ्यातून एमआयएमचे शाह फारुक अन्वर विजयी झाले आहेत. तर, अपक्ष उमेदवार राजवर्धन कदमबांडे यांना दुसऱ्या क्रमांकाची 43 हजार 679 मते पडली. तेलगी प्रकरणात हात असल्याच्या आरोपात गोटे यांनी 2003मध्ये अटक करण्यात आली होती. त्यांना पुण्यातील येरवडा कारागृहात ठेवण्यात आले होते. 2007मध्ये त्यांची जामिनावर मुक्तता झाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp leader anil gote from dhule writes open letter about devendra fadnavis