Raj Thackrey: मनसे विरुद्ध भाजप संघर्षाला सुरुवात, ठाकरे-शेलारांमध्ये जुंपली! मोठ्या नेत्यांवर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackrey

Raj Thackrey: मनसे विरुद्ध भाजप संघर्षाला सुरुवात, ठाकरे-शेलारांमध्ये जुंपली! मोठ्या नेत्यांवर...

गेल्या काही दिवसामध्ये राज ठाकरे आणि भाजप आगामी निवडणुकांसाठी युती करतील अशा चर्चा सुरू होत्या. भाजप आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठीही चालू होत्या. अशातच कर्नाटकात भाजप पक्षाला नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मिळालेली हार यावरून राज ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली. तर त्या टीकेला शेलार यांनी उत्तर दिलं त्यामुळे भाजप आणि राज ठाकरे यांच्यात काही बिनसलं आहे का अशा चर्चा सोशल मिडियावर आणि राजकीय वर्तुळात दिसून येत आहेत.

अशातच पुन्हा एकदा राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यामध्ये जुंपल्याचं दिसून येत आहे. "तुम्ही उत्तम बोलता, तुम्ही मोठे नेते आहात, तुम्ही अभ्यास करण्याचा प्रयत्न करत आहात, पण सगळ्याच बाबतीत तुम्ही बोललं पाहिजे आणि बोलल्यावर तुमचं खरंच असेल, असं मानण्याचं कारण नाही" अशा शब्दात भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सुनावलं आहे.

आशिष शेलार काय म्हणाले?

"सन्माननीय राज ठाकरेंना आमचं निवेदन आहे. होय, तुम्ही उत्तम बोलता, तुम्ही मोठे नेते आहात, तुम्ही अभ्यास करण्याचा प्रयत्न करत आहात. पण सगळ्याच बाबतीत तुम्ही बोललं पाहिजे आणि बोलल्यावर तुमचं खरंच असेल, असं मानण्याचं कारण नाही. व्यक्तिगत संबंधात तुम्ही व्यक्तिगत टीका केली तर आम्ही उत्तर देणार नाही, पण तुम्ही जर माझ्या पक्षावर आणि पक्षाच्या सर्वोच्च नेत्यावर टीका केली, तर तुमच्या विरोधात बोलायला मुलाहिजा ठेवणार नाही".

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची विशेष बैठक काल मुंबईमध्ये पार पडली. यावेळी शेलार यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

राज ठाकरे यांनी कर्नाटक निवडणुकीमधील विजयासंबधी बोलताना भाजपवर आरोप केले होते. यावरुन आशिष शेलार यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. या टीकेवरुन राज ठाकरेंनी पुन्हा हल्लाबोल केला.